राज्यस्तरीय विश्वकोश स्पर्धेत सावर्डे विद्यालयाचा बोलबाला

 सिद्धी बागवेचा पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सन्मान

चिपळूण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळामार्फत मार्च २०२६ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाइन ‘विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धेत’ सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सावर्डेच्या विद्यार्थिनी सिद्धी बागवे हिने राज्यस्तरावर चौथा क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले. सिद्धीच्या या यशाबद्दल मुंबई येथील गडकरी रंगायतन सभागृहात आयोजित कार्यक्रमात तिला प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह तसेच ७,५०० रुपये रोख पारितोषिक देऊन रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत व मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
सिद्धी बागवे हिची कौटुंबिक परिस्थिती बेताची असून तिचे वडील शेतकरी, तर आई घरकाम करतात. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत सिद्धीने जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण मेहनतीच्या जोरावर शिक्षण सुरू ठेवले आहे. विविध बाह्य स्पर्धांमध्ये सातत्याने सहभागी होत तिने आपल्या गुणवत्तेची चुणूक दाखवून दिली आहे. याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र वारे म्हणाले की, “प्रामाणिकपणा, जिद्द आणि कष्ट करण्याची तयारी या गुणांच्या जोरावर सिद्धीने हे यश संपादन केले आहे. प्रतिकूल परिस्थितीतही शिक्षणाची वाट न सोडता तिने मिळवलेले हे यश कौतुकास्पद आहे. भविष्यातही सिद्धी निश्चितच मोठे यश संपादन करेल.” सिद्धीने राज्यस्तरीय स्पर्धेत मिळवलेल्या या यशामुळे गोविंदराव निकम विद्यालयाच्या नावलौकिकात भर पडली असून सह्याद्री शिक्षण संस्थेने राज्यस्तरावर आपल्या गुणवत्तेचा ठसा उमटविला आहे.
सिद्धीच्या यशाबद्दल सह्याद्री शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व आमदार शेखर निकम, उपाध्यक्ष प्रशांत निकम, डॉ. इसाक खतीब, युगंधरा राजेशिर्के, कार्याध्यक्ष अनिरुद्ध निकम, शालेय समितीचे चेअरमन शांताराम खानविलकर, सचिव महेश महाडिक, सर्व विश्वस्त, प्राचार्य राजेंद्र वारे, उपप्राचार्य विजय चव्हाण, पर्यवेक्षक महेश कुलकर्णी, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालकांनी तिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सिद्धीचा पालकमंत्री उदय सामंत व प्राचार्य राजेंद्र वारे व जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे राजेंद्र पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.