चिपळूण (प्रतिनिधी) : शहरापेक्षा कोकणातील ग्रामीण भागातील मुलांकडे जबाबदारी वाहण्याची क्षमता अधिक असून त्यांच्या सुप्त गुणांना ओळखून देशाचा जबाबदार नागरिक घडवण्याच्या निमित्ताने रंगीत तालीम उपलब्ध करून देणारी मार्गताम्हाणे एज्युकेशन सोसायटी आहे, असे गौरवोद्गार वाशिष्ट उद्योग समूहाचे प्रमुख व व भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनी शिक्षण संस्थेमार्फत आयोजित विद्यार्थी परिषद मंत्रिमंडळ शपथविधी सोहळा २०२६ प्रसंगी व्यक्त केले.
कार्यक्रमास घरडा केमिकल्स लोटे, व्यवस्थापक बापूराव पवार, मार्गताम्हणे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मधुकराव चव्हाण,उपाध्यक्ष अजित साळवी, संचालक, पदाधिकारी, चिपळूण नगर परिषदेचे नगरसेवक शशिकांत मोदी, प्रशालेचे मुख्याध्यापक भाऊ लकेश्री प्राचार्य डॉ. बाळासाहेब यादव उपस्थित होते. अध्यापना बरोबरच विद्यार्थ्यांना उज्वल भारताचे सुजाण नागरिक बनवण्याच्या उद्देशाने मार्गताम्हणे एज्युकेशन सोसायटी नेहमीच खूप अनेक उपक्रमशील कार्यक्रम आयोजित करीत असते. त्याचाच एक भाग म्हणून वसंतराव भागवत माध्यमिक विद्यालय, कै.सौ वामन पेठे कनिष्ठ कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय व डॉ. तात्यासाहेब नातू कला व वरिष्ठ वाणिज्य महाविद्यालय मार्गताम्हणे यांच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय रुक्मिणी गणपतराव चव्हाण सभागृहामध्ये विद्यार्थी परिषद मंत्रिमंडळ शपथविधी सोहळा 2026 संपन्न झाला. भारताचे मंत्रिमंडळ व संसदीय कार्यप्रणाली आणि नागरिकांची कर्तव्य हे विद्यार्थी दशेपासूनच समजावून देण्याच्या उदात्त उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. माध्यमिक प्रशालीच्या मंत्रिमंडळातील प्रमुख मंत्र्यांना उद्योजक बापूराव पवार यांनी सभापती पद भूषवून शपथ दिली. तर कनिष्ठ महाविद्यालय व वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी मंत्री प्रमुखांना वाशिष्ठ उद्योग समूहाचे प्रमुख प्रशांत यादव यांनी सभापतीपद भूषवून शपथ दिली. माध्यमिक विभागांमध्ये पंतप्रधान म्हणून सोहम महाडिक, विद्यार्थी प्रतिनिधी मंडळ प्रमुख अस्मिता पाटणकर, क्रीडामंत्री चिन्मय काळुबा, वाचन मंत्री शर्वरी निकम यांनी शपथ घेतली. कनिष्ठ विभागामधून ऋतुराज लांजेकर पंतप्रधान, दीक्षा बोबले (एल आर), क्रीडा मंत्री ऋग्वेद तावडे, सुप्रिया जाधव, सांस्कृतिक मंत्री म्हणून आयुष पेजले ,शुभ्रा चव्हाण तर वाचन मंत्री म्हणून आर्यन घडशी, गौरी चव्हाण यांनी शपथ घेतली. वरिष्ठ महाविद्यालयांमधून अनुक्रमे पंतप्रधान केदार लिंगायत, अंतर्गत व्यवस्थापन मंत्री प्रथमेश जाडे, क्रीडा मंत्री प्रथमेश चिखलकर, सांस्कृतिक मंत्री श्रेया कदम, राष्ट्रीय सेवा योजना मंत्री आर्यन नाचरे व ग्रंथालय मंत्री म्हणून श्रीया कळंबटे यांनी शपथ घेतली. विद्यार्थी दशेपासूनच विद्यार्थ्यांच्या खांद्यावर जबाबदारीची जाणीव करून देण्याच्या उद्देशाने मार्गतामाने एज्युकेशन सोसायटी मार्फत घेतलेल्या या अनोखा अनोख्या उपक्रमाबद्दल प्रशांत चव्हाण यांनी गौरवोद्गार उद्गार काढले.
प्रास्ताविकामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बाळासाहेब यादव यांनी मुंबई विद्यापीठामार्फत घेतलेल्या तायक्वांदो स्पर्धा व एमकेसीएल एमएस-सीआयटी मार्फत महाविद्यालयात आयोजित केलेले तांत्रिक कोर्सेस याची माहिती दिली. माध्यमिक प्रशालेचे मुख्याध्यापक भाऊ लकेश्री यांनी माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रगतीचा आलेख प्रस्तुत केला. घरडा केमिकल चे व्यवस्थापक बापूराव पवार यांनी विद्यार्थी परिषद मंत्रिमंडळांमधील महिला व पुरुष मंत्रिमंडळाच्या समान विभागणी बद्दल कौतुक करीत भारतीय संसद व्यवस्थेने मंत्रिमंडळामध्ये स्त्री-पुरुष समानतेबाबत मार्गताम्हणे शिक्षण संस्थेच्या विद्यार्थी परिषद मंत्रिमंडळ शपथविधी कार्यक्रमाचा आदर्श घेण्याबाबत विचार व्यक्त केले.
प्रशांत यादव यांनी आपल्या भाषणामध्ये उद्याची भावी पिढी घडवण्याच्या निमित्ताने मार्गताम्हाणे एज्युकेशन सोसायटी मार्फत आयोजित केलेल्या विविध उपक्रमाबाबत समाधान व्यक्त करीत तरुण पिढीला घडवण्यामध्ये संस्थेच्या योगदानाबाबत कौतुक केले. अध्यक्षीय भाषणामध्ये संस्थेचे अध्यक्ष व माजी आमदार मधुकरराव चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना लोकशाहीची माहिती व्हावी या उद्देशाने दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या विद्यार्थी परिषद मंत्रिमंडळाचे औचित्य स्पष्ट करीत सध्या भरकट जात असणाऱ्या तरुण पिढीला विद्यार्थी दशेपासूनच जबाबदारीची जाणीव दिली गेली तर हे तरुण जबाबदार बनतील व देश तसेच समाज माता-पिता यांच्याबाबत कर्तव्यशील बनतील असे उद्गार काढले. दर महिन्याला या मंत्रिमंडळामार्फत शाळा, कॉलेज विकासाबाबत विविध सभा घेतल्या जातात हे सांगत विद्यार्थी हा घटक शाळा कॉलेज प्रशासनामध्ये सहभागी होतो, याचे एकमेव उदाहरण भारतातील कोकणात असणाऱ्या आपल्या शिक्षणसंस्थेत पहावयास मिळते याबद्दल समाधान व्यक्त केले. माध्यमिक प्रशालीचे कलाशिक्षक सुशीलकुमार कुंभार यांनी रेखाटलेल्या प्रभू रामचंद्रांची चित्र प्रतिमा प्रशांत यादव यांना भेट करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. वर्षा बोबस्कर, प्रा.तन्वी भागवत यांनी केले. वरिष्ठ विभागाचे नियोजन डॉ. नामदेव डोंगरे यांनी केले. आभार डॉ. प्राजक्ता शिंदे यांनी मानले. कार्यक्रमास विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली.












