रानभाज्यांमधून शरीराला आवश्यक असलेली जीवनसत्व मिळतात ; राजश्री साळुंखे
कणकवली महाविद्यालयात रानभाज्या व पाककृती महोत्सव संपन्न
कणकवली | मयुर ठाकूर : निसर्गाने नटलेल्या कोकण भूमीत रानमेवा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. रानभाज्यांमधून शरीराला आवश्यक असलेली जीवनसत्व मिळतात. याचा सर्वांनी आपल्या आहारात उपयोग केला पाहिजे. यातून विविध आजारांवर लढण्यासाठी प्रतिकार शक्ती वाढते. असे प्रतिपादन कणकवली शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन डॉ. राजश्री साळुंखे यांनी केले.
कणकवली कॉलेज, कणकवलीचे आयक्यूएसी व सायन्स असोसिएशन आणि स्नेह सिंधु कृषि पदवीधर संघ, रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रल, आत्मा कृषि विभाग सिंधुदुर्ग व उमेद सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने “रानभाज्या महोत्सव २०२३ अंतर्गत “जिल्हास्तरीय रानभाज्या पाककृती स्पर्धा व रानभाज्या प्रदर्शनाचे” आयोजन कणकवली कॉलेज, कणकवली येथे केले होते. या कार्यक्रमात डॉ. साळुंखे बोलत होत्या.
यावेळी आयएएस अधिकारी विशाल खत्री, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत, रोटरी क्लब कणकवली सेंट्रलचे अध्यक्ष रवी परब, रोटेरियन विद्याधर तायशेट्ये, दादा कुडतरकर, मेघा गांगण, कणकवली कॉलेजच्या प्रभारी प्राचार्य युवराज महालिंगे, प्रा. डॉ. बाळकृष्ण गावडे, डॉ. निलेश कोदे, तालुका कृषी अधिकारी वृषाली मुळये, स्नेहसिंधू कृषी पदवीधर संघाचे अध्यक्ष हेमंत सावंत, पंकज दळी, कृषी विभाग आत्मा सिंधुदुर्गच्या भाग्यश्री नाईकनवरे, उमेद अभियान च्या अमृता चव्हाण यांच्यासह कणकवली कॉलेजचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व जिल्हाभरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
यावेळी विशाल खत्री म्हणाले, सध्याच्या युगात तरुण पिढी फास्ट फूड व जंक फूडच्या विळख्यात अडकत आहे. त्यांना या विळख्यातुन बाहेर काढण्यासाठी निसर्गात उपलब्ध असलेल्या देशी रानभाज्यांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. यासाठी रानभाज्यांचे सर्वत्र जनजागृती केली पाहिजे, असे आवाहन केले.
यावेळी रवी परब, भाग्यश्री नाईकनवरे, प्राचार्य युवराज महालिंगे, मंगलताई परुळेकर आदींनी आपले मनोगत व्यक्त करून स्पर्धेतील स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.
रानभाज्या पाककृती स्पर्धा व रानभाज्या प्रदर्शन याची सुरुवात दीपक प्रज्वलन करून तसेच फीत कापून करण्यात आली. रानभाज्या पाककृती स्पर्धेसाठी जिल्हाभरातील विविध भागामधील १३९ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.
या स्पर्धेमध्ये सर्व स्पर्धकांनी विविध रानभाज्यापासून उत्कृष्ट पाककृती तयार केली होती. रानभाज्या प्रदर्शनासाठी केळफुल, गुळवेल, भुई आवळा, एक पानी, लाजाळू, तेरंज, अळूची पाने, भोपळा पान, मुगणी, मोठा दिंडा, कपाळ फोडी, सोनारी वेलीची पाने, गारंबी, आघाडा, करडू, शेवगा, नीव, सुरणाची पाने इत्यादी रानभाज्यांचा समावेश होता.











