जनतेने नाकारलेले वैभव नाईक गद्दारीचा कलंक!

काँग्रेस सोडणाऱ्या गद्दार नाईकांनी निष्ठेच्या बाता करू नये 

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी वैभव नाईकना सुनावले 

आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वात शेकडो कोटींच्या विकास निधीची आकडेवारीच मांडली 

मालवण | प्रतिनिधी : विकासाची कोणतीही दृष्टी नसलेले व पूर्णपणे अपयशी ठरलेले माजी आमदार वैभव नाईक यांच्या डोक्यातील ‘वरचा मजला’ पूर्णपणे रिकामा आहे. १० वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी मतदारसंघाचा विकास करायचा सोडून स्वतःचे वजन वाढवण्यापलीकडे काहीही केले नाही. त्यांच्या अपयशी कारभारामुळे कुडाळ मालवणला २५ वर्षे मागे ढकलण्याचे पाप त्यांनी केले. यांचेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असतानाही यांना मतदार संघाचा विकास करणे शक्य झाले नाही. यांची पात्रता नसल्याने त्यांना राज्यमंत्रीपद ही मिळाले नाही. स्वार्थासाठी 2024 च्या निवडणुकीत शिंदे शिवसेनेत प्रवेश करण्याच्या तयारीत असलेल्या वैभव नाईक यांनी निष्ठेच्या बाता करू नये. तुम्ही कोणाला भेटलात कोणाशी काय चर्चा झाली याची कुंडलीच माझ्याकडे आहे असे सांगत शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी माजी आमदार वैभव नाईक यांची पोलखोल करताना सडकून टीका केली आहे.

दत्ता सामंत यांच्या कुंभारमाठ येथील निवासस्थानी पत्रकार परिषद झाली. यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर, शिवसेना तालुकाप्रमुख मंदार लुडबे, शहर संघटक राजू बिडये उपस्थित होते.

पत्रकार परिषदेत बोलताना दत्ता सामंत यांनी वैभव नाईक यांच्या खोट्या प्रवृत्तीचा बुरखा फाडला. “२०२४ च्या निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदे शिंदे साहेबांच्या शिवसेनेच्या माध्यमातून शिवसेनेतून उमेदवारीची चाचपणी सुरु होती. मात्र, निलेश राणेंना शब्द दिला असल्याने निवडणूक लढवण्याबाबत आमचा प्रश्नच नव्हता. त्यावेळी वैभव नाईक मात्र शिंदे शिवसेनेत येण्यास सेफ निवडणुक लढण्यास उतावीळ झाले होते. परंतु, तिथे निलेश राणेंशिवाय पर्याय नाही. आपली डाळ शिजणार नाही हे लक्षात आल्यावर त्यांनी पळ काढला. असे असताना निष्ठेच्या बाता करून आता ते गद्दारीचा कलंक पुसण्याचे नाटक करत खोटारडेपणा करत आहेत,” असा पर्दाफाश सामंत यांनी केला.

*चोराच्या उलट्या बोंबा*

नाईक यांच्या निष्ठेच्या गप्पांवर प्रहार करताना सामंत म्हणाले, “नाईक कुटुंब मूळ काँग्रेसचाच आहे. वैभव नाईकांचे वडील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते, वैभव स्वतः युवक काँग्रेसचे अध्यक्ष होते. त्यांच्या वडिलांना काँग्रेसने विधानसभेचे तिकीट देऊनही ते पराभूत झाले. काँग्रेसने सर्वकाही देऊनही सत्ता सोडून नाईकांनी शिवसेनेत प्रवेश केला. आता ते निष्ठेच्या आव आणत आहेत, हा ‘चोराच्या उलट्या बोंबा’ असा प्रकार आहे.”

*यांचे मुख्यमंत्री असतानाही यांना राज्यमंत्रीपद ही मिळाले नाही*

वैभव नाईक यांच्या १० वर्षांच्या निष्क्रियतेचा पंचनामा करताना सामंत म्हणाले, नाईक यांच्याकडे जरा तरी बुद्धी अन् कर्तृत्व असते, तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांना मंत्रीपद मिळाले असते. परंतु ठाकरेंनाही त्यांची क्षमता उत्तम ठाऊक होती. विधिमंडळात एकही ठोस प्रश्न न मांडता, १० वर्षे फक्त पर्ससीन अन् पारंपारिक मच्छीमारांमध्ये वाद लावून स्वतःची टक्केवारी साधली. मामा वरेरकर नाट्यगृह, भुयारी गटार योजना, नळपणी योजना रखडल्या. यासोबत अनेक कामे रखडली काहीच झाले नाही. मतदार संघात भांडण लावून देणे. सी वर्ड, विमानतळ प्रकल्प यासह अन्य प्रकल्पावरून राजकारण करणे. हेच काम वैभव नाईक आणि उबाठा गटाने केले.

*आमदार निलेश राणे यांनी कर्तुत्व सिद्ध केले ; शेकडो कोटी विकासनिधी*

आमदार निलेश राणे यांनी अवघ्या दीड वर्षात आपले कर्तृत्व सिद्ध केले. मागील दहा वर्षात जेवढा निधी आला नाही त्यापेक्षा जास्त निधी आमदार निलेश राणे यांनी मतदार संघात खेचून आणला. मतदारसंघात आणलेल्या ऐतिहासिक निधीचा पाढा दत्ता सामंत यांनी वाचला. किनारपट्टी सुरक्षित करण्याच्या दृष्टीने बंधारा विकासासाठी शेकडो कोटी निधी, आशियायि डेव्हलपमेंट बँक ADB कडून ओरोस-कसाल मालवण

7 मीटर रुंद आणि 35 किलोमीट रस्ता काँक्रीटीकरण करण्यासाठी 306 कोटींचा निधी मंजूर. सिंधुदुर्ग जिल्हा मेडिकल कॉलेजसाठी ३५० कोटींची तरतूद. क्रिटिकल केअर सेंटर व आरोग्य केंद्रांसाठी २.८० कोटी मंजूर, तारकर्ली, घोडगे, जांभवडे येथे नवीन इमारती. कुडाळ मालवण मतदारसंघासाठी महावितरणची पहिली भुयारी विद्युत वाहिनी अन् मालवणमध्ये अनेक सब-स्टेशन्सची मंजुरी. विकासासाठी शेकडो कोटींचा निधी, मामा वरेरकर नाट्यगृहाचे नूतनीकरण, रॉक गार्डन विकास, नळपाणी योजना, रस्ते विकास, अन्य विकास प्रकल्प आणि संरक्षक बंधारे. कोकणातील दशावतारी कलाकारांसाठीचा निधी २ कोटींवरून थेट ४ कोटींपर्यंत दुप्पट वाढवून घेतला. विकासकामांची यादी मोठी आहे. असे सांगत शेकडो कोटी निधीच्या विकास कामांची माहिती दत्ता सामंत यांनी दिली. शासकीय निधीव्यतिरिक्त आमदार निलेश राणे यांनी स्वतःच्या खिशातून तब्बल १५ ते २० कोटी स्वखर्चातून जनहितासाठी तत्परतेने विकासकामे केली. सामान्य जनतेच्या समस्या सोडवल्या. विधानसभेत जनतेचा आवाज म्हणून निलेश राणे यांनी समस्या मांडल्या आणि जनतेचे प्रश्न सोडवले शेतकरी बागायतदार यांनाही न्याय मिळवून दिला मच्छीमारांना न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीने त्यांची भूमिका महत्त्वाची ठरली.

*आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वात निवडणुकीतही मोठे यश*

आठ महिन्यापूर्वी झालेल्या मालवण नगरपालिका निवडणुकीत तसेच जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकीत जनतेने निलेश राणेंच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला. बहुमताने व निर्विवाद स्वरूपात आमचे उमेदवार विजयी झाले. नाईकांचा एकच उमेदवार जिल्हा परिषदेत कसाबसा नाका-तोंडात पाणी जाऊन निवडून आला आहे. सर्वत्र आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वात सत्ता स्थापन झाली. त्यामुळे “वैभव नाईकांनी आता टीका करण्यापेक्षा स्वतःच्या १० वर्षांच्या अपयशाचे उत्तर द्यावे. त्यांच्या पोटात उठलेल्या शुळावर त्यांनी त्वरित योग्य औषध प्यावे. असाही सबुरीचा सल्ला दत्ता सामंत यांनी दिला.

*2029 ला आमदार निलेश राणे यांचा विजय पन्नास हजार मताधिक्याने निश्चित*

विकासाचे व्हिजन असणारे नेतृत्व म्हणून आमदार निलेश राणे यांच्याकडे पाहिले जाते. सोबतच विधानसभेत जनहिताचे प्रश्न मांडून त्यांना न्याय देण्याचे काम व मतदार संघात मोठा निधी खेचून आणण्याची क्षमता हे पाहता आगामी २०२९ च्या विधानसभेत जनता निलेश राणेंना ५० हजारांपेक्षा जास्त मताधिक्याने विजयी करेल. कमी मताधिक्य मिळाले तर मी राजकारण सोडेन!” अशी स्पष्ट आणि रोखठोक भूमिका दत्ता सामंत यांनी मांडली. तसेच आगामी काळातही उबाठा गटातील उरले सुरले अनेक कार्यकर्ते शिवसेनेत पक्ष प्रवेश करतील असेही दत्ता सामंत यांनी सांगितले.