दिल्लीतील ऑल इंडिया थलसेना कॅम्पसाठी मालवणच्या रूपाली करंगुटकरची निवड

सिंधुदुर्ग महाविद्यालय एनसीसी विभागात सीनियर अंडर ऑफिसर ; फायरिंग कॉम्पिटिशनमध्ये महाराष्ट्राचे करणार प्रतिनिधित्व

मालवण | प्रतिनिधी : स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय, मालवणच्या राष्ट्रीय छात्र सेना (NCC) विभागातील सीनियर अंडर ऑफिसर रूपाली करंगुटकर हिची दिल्ली येथे 31 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर 2026 या कालावधीत होणाऱ्या ऑल इंडिया थलसेना कॅम्प – फायरिंग कॉम्पिटिशनसाठी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड झाली आहे. तिच्या या निवडीमुळे महाविद्यालयासह कृ. सी. देसाई शिक्षण संस्था आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

 

गेल्या जून महिन्यापासून सुरू असलेल्या निवड प्रक्रियेत सुमारे साडेतीन हजार विद्यार्थ्यांमधून रूपालीची सुरुवातीला निवड झाली. त्यानंतर 58 महाराष्ट्र बटालियन, ओरस यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कोल्हापूर येथे आयोजित विविध प्रशिक्षण व निवड शिबिरांमध्ये तिने सहभाग घेतला. प्रत्येक टप्प्यावर उत्कृष्ट कामगिरी करत तिने पुढील निवडीत स्थान मिळवले.

 

रूपालीच्या यशामध्ये 58 महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल अजय राज, लेफ्टनंट कर्नल तनुज मंडलिक तसेच अन्य आर्मी ऑफिसर्स यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तिने फायरिंगसह NCC मधील विविध कौशल्यांचे प्रशिक्षण घेतले.

 

महाविद्यालयाच्या NCC विभागाचे प्रमुख असोसिएट NCC ऑफिसर लेफ्टनंट प्राध्यापक डॉ. एम. आर. खोत यांचेही तिला सातत्यपूर्ण मार्गदर्शन लाभले. जूनपासून तिने दहा दिवसांची सहा विविध प्रशिक्षण शिबिरे पूर्ण केली. प्रत्येक शिबिरानंतर झालेल्या निवड प्रक्रियेत तिची पुढील टप्प्यासाठी निवड होत गेली. अहमदनगर येथील फायरिंग कॉम्पिटिशननंतर तिने राष्ट्रीय स्तरावर झेप घेतली.

 

रूपालीच्या या यशाबद्दल कृ. सी. देसाई शिक्षण संस्थेचे अध्यक्ष किरण ठाकूर, महाविद्यालयाचे प्राचार्य के. के. राबते, लेफ्टनंट प्रा. डॉ. एम. आर. खोत तसेच पदाधिकारी, प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी तिचे अभिनंदन केले. मालवणचे तहसीलदार गणेश लव्हे यांनीही शुभेच्छा दिल्या.

जिद्द, शिस्त, सातत्यपूर्ण सराव आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर रूपालीने राष्ट्रीय स्तरावर मजल मारली असून दिल्लीतील स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याचा मान मिळवला आहे.