बुरूमतळी येथे जखमी अवस्थेतील गाय व वासराला पालिकेच्या मदतीने उपचारासाठी हलविले

नागरिकाच्या फोननंतर चिपळूण नगरपालिका आरोग्य विभागाची तातडीने धाव; पावणेदोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर मोहीम यशस्वी

चिपळूण : बुरूमतळी परिसरात घराच्या दारात गाय व्याल्याची माहिती मिळताच चिपळूण नगरपालिका प्रशासनाने तातडीने दखल घेत गाय आणि नवजात वासराला सुरक्षितपणे उपचारासाठी हलविले. पालिका अधिकारी, आरोग्य विभागाचे कर्मचारी, नगरसेवक, पशुवैद्यकीय अधिकारी तसेच स्थानिक नागरिकांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे ही मोहीम यशस्वी झाली.
शुक्रवारी सकाळी सव्वासातच्या सुमारास बुरूमतळी येथील ऐश्वर्या चितळे यांनी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधत त्यांच्या घराच्या दाराजवळ गाय व्याल्याची माहिती दिली. तसेच गाय व वासराची तातडीने दखल घेऊन त्यांना उपचारासाठी हलविण्याची विनंती केली. यानंतर या घटनेची माहिती तत्काळ चिपळूण नगरपालिका आरोग्य विभाग प्रमुख वैभव निवाते यांना देण्यात आली.
माहिती मिळताच निवाते यांनी सकाळी आठच्या सुमारास नगरपालिका आरोग्य विभागाची टीम घटनास्थळी पाठवली. पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी प्रथम गोंडस नवजात वासराला वाहनामध्ये सुरक्षितपणे ठेवले. मात्र, गाय घाबरल्याने सैरावैरा पळत होती. त्यामुळे तिला पकडून वाहनात चढविण्यासाठी कर्मचाऱ्यांना मोठी कसरत करावी लागली.
दरम्यान,भाजपा गटनेते शशिकांत मोदी, नगरसेवक निहार कोवळे आणि नगरसेवक संदीप भिसे यांनी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून डॉक्टर घटनास्थळी उपस्थित राहतील, याची व्यवस्था केली. त्यानंतर पालिकेचे अधिकारी, आरोग्य विभागाचे कर्मचारी आणि उपस्थित नागरिकांनी अथक प्रयत्न करत अखेर सैरावैरा धावणाऱ्या गाईला ताब्यात घेतले आणि तिला वाहनामध्ये सुरक्षितपणे चढविण्यात आले.
ही संपूर्ण मोहीम सकाळी सव्वाआठ ते दहा वाजेपर्यंत, म्हणजेच सुमारे पावणेदोन तास सुरू होती. या काळात समाजसेविका राधाताई लवेकर, अनिकेत साळवी, नगरसेवक शशिकांत मोदी, पशुवैद्यकीय अधिकारी तसेच आरोग्य विभागाचे कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होते.
गाय आणि वासराला उपचारासाठी सुरक्षित स्थळी हलविताना मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक सुमारे अर्धा तासापेक्षा अधिक काळ थांबविण्यात आली होती. यावेळी स्थानिक नागरिक, रिक्षाचालक तसेच विविध पक्षांचे पदाधिकारी यांनीही प्रशासनाला सहकार्य केले. सर्वांच्या सहकार्यामुळे गाय आणि तिच्या नवजात वासराला सुरक्षितपणे वाहनात भरून उपचारासाठी हलविण्यात आले.
या प्रसंगातून नागरिकांनी दिलेल्या माहितीची तातडीने दखल घेत प्रशासनाने केलेली कार्यवाही आणि विविध स्तरांवरील नागरिकांच्या सहकार्याचे चित्र पाहायला मिळाले.
दीपक किंजळकर, राजेंद्र नवरत, अमित टेरवकर,अनिल खापरे,भास्कर शेटकर, विश्वनाथ मोहिते,अमोल गमरे,उमेश मोहिते,दयानंद मोहिते,संदीप शेडगे,रमेश पवार,राहुल तांबे,नितेश कांबळे आदी मंडळींनी मदत कार्यात मोलाचे सहकार्य केले