तळवडे येथे एनसीएमसी स्मार्ट कार्ड नोंदणी कॅम्पला उत्स्फूर्त प्रतिसाद

१०२ ज्येष्ठ नागरिक व महिलांनी घेतला लाभ

​सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी तालुका ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने आणि तळवडे पंचक्रोशी ज्येष्ठ नागरिक संघाच्या सहकार्याने तळवडे येथे ज्येष्ठ नागरिक तसेच महिलांसाठी एनसीएमसी (NCMC) स्मार्ट कार्ड नोंदणी कॅम्पचे यशस्वी आयोजन करण्यात आले. शनिवारी सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत झालेल्या या कॅम्पला तळवडे आणि परिसरातील नागरिक, विशेषतः ज्येष्ठ व महिलांनी उदंड प्रतिसाद दिला.

​गावातील नागरिकांना स्मार्ट कार्ड काढण्यासाठी सावंतवाडी शहरात जावे लागू नये आणि शासनाच्या सुविधांचा लाभ थेट त्यांच्या गावातच मिळावा, या मुख्य उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला होता. सावंतवाडी येथील “दीप बिझनेस” यांच्या माध्यमातून ही संपूर्ण प्रक्रिया गावातच पूर्ण करण्यात आली. या शिबिराचा परिसरातील सुमारे १०२ ज्येष्ठ नागरिक आणि महिलांनी प्रत्यक्ष लाभ घेतला.

​एनसीएमसी कार्डच्या माध्यमातून पात्र ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना एसटी महामंडळाच्या नियमानुसार मिळणाऱ्या प्रवास सवलतींचा लाभ घेणे अत्यंत सुलभ होणार आहे. सध्या एसटी प्रवासात महिलांना ५० टक्के सवलत उपलब्ध असून पात्र ज्येष्ठ नागरिकांनाही नियमानुसार सवलत मिळते. डिजिटल स्वरूपातील हे स्मार्ट कार्ड एसटी प्रवासातील व्यवहार अधिक सुलभ, पारदर्शक आणि आधुनिक बनविण्यास मदत करेल. त्यामुळे नियमित एसटी प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी हे कार्ड अत्यंत मोलाचे ठरणार आहे.

​ग्रामीण भागातील नागरिकांना शहरात मारल्या जाणाऱ्या हेलपाट्यांपासून मुक्ती देणारा हा उपक्रम वेळ, श्रम आणि आर्थिक बचत करणारा ठरला. शासनाच्या लोककल्याणकारी योजना थेट गावपातळीवर पोहोचविण्याच्या या प्रयत्नाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.

​हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सावंतवाडी तालुका ज्येष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष राजेंद्र बिर्जे, सचिव प्रकाश राऊळ, सहसचिव शामसुंदर निवेलकर, खजिनदार विदुल पाटकर, कार्यकारिणी सदस्य अण्णा मालवणकर, श्री. मुळीक, श्रद्धा सावंत, नंदकिशोर कोंडये, मेघना राऊळ, अमोल केसरकर, बाबा मालवणकर, तसेच दीप बिझनेसचे दत्तप्रसाद अरविंदेकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

​या प्रसंगी तळवडे येथील ज्येष्ठ नागरिक संघात नव्याने दाखल झालेले सदस्य विजय बुगडे आणि बाळू साळगावकर यांनीही मोलाचे सहकार्य केले; त्याबद्दल संघाच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार व स्वागत करण्यात आले. भविष्यातही अशाच प्रकारचे लोकहिताचे विविध उपक्रम राबविण्याचा मानस सावंतवाडी तालुका ज्येष्ठ नागरिक संघाने व्यक्त केला आहे.