आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून वीज समस्या मार्गी

मालवण शहर पारकरवाडीत नागरिकांनी व्यक्त केले आभार

मालवण | प्रतिनिधी : मालवण शहरातील स्वामी हॉटेलच्या पाठीमागील पारकरवाडी येथे धीरज केळुसकर यांच्या घरापासून दत्तात्रय चिपकर यांच्या घरापर्यंत तीन नवीन विद्युत पोल उभारण्यात आले. या पोलच्या माध्यमातून सहा घरांना स्वतंत्र सर्व्हिस लाईन देण्यात आल्याने नागरिकांची वीज समस्या मार्गी लागली आहे. याबाबत समाधान व्यक्त करत नागरिकांनी आमदार निलेश राणे व पदाधिकारी यांचे आभार व्यक्त केले.

यापूर्वी या परिसरातील अनेक घरांना दूरवर असलेल्या एकाच विद्युत पोलवरून सर्व्हिस लाईन देण्यात आली होती. त्यामुळे एका पोलवर मोठ्या प्रमाणात भार येत असल्याने वारंवार वीज समस्या निर्माण होत होत्या. नागरिकांना होणारा हा त्रास लक्षात घेऊन वीज समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यानुसार काम पुर्ण करून समस्या दूर करण्यात आली.

आमदार निलेश राणे आणि शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या माध्यमातून, तसेच जिल्हापरिषद उपाध्यक्ष दादा साईल, नगराध्यक्षा ममता वराडकर आणि उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांच्या प्रयत्नातून हे काम मार्गी लागले. उपतालुकाप्रमुख बाळू नाटेकर, दया केळुसकर आणि धीरज केळुसकर यांनी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या वारंवार केलेल्या पाठपुराव्यामुळे हे काम लवकरात लवकर पूर्ण झाले.

नवीन विद्युत पोल उभारून सहा घरांना स्वतंत्र सर्व्हिस लाईन मिळाल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. याबाबत नागरिकांनी समाधान व्यक्त केले. यावेळी पारकरवाडी परिसरातील नागरिक उपस्थित होते. सर्व ग्रामस्थांनी आमदार निलेश राणे यांच्यासह शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.