चिपळूण (प्रतिनिधी) : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चिपळूण तालुक्यातील सावर्डे परिसरातील नागरिकांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तसेच विविध प्रलंबित समस्यांवर तोडगा काढण्यासाठी सावर्डे ग्रामपंचायत, सावर्डे व्यापारी संघटना आणि संबंधित शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक नुकतीच पार पडली.
बैठकीत सावर्डे बाजारपेठ व परिसरातील रस्त्यांची दुरुस्ती, महामार्गावरील मृत्यूचा सापळा बनलेला आरती स्वीट समोरील खड्ड्यावरती ठोस उपाय योजना करून तसेच ब्रिटिश कालीन जुन्या पुलावरतीच महामार्ग तसाच बांधल्याने सदर पुलाचे ऑडिट करण्याचे सांगून होणाऱ्या नागरिकांच्या त्रासाला संपूर्ण महामार्ग प्रशासनाला जबाबदार धरले.
तसेच सर्विस मार्गचे गटारावरील तुटलेले स्लॅब तसेच, वाढलेले गवत, पडलेले खड्डे व उखडलेले डांबरीकरण, महामार्गावरील पददीपांची अनियमितता त्यासाठी लागणारा ट्रान्सफॉर्मर त्याचे प्रयोजन महामार्ग लगत उभ्या असलेल्या बस स्थानकाची पिकप शेड गेले वर्षभर मोडकळीस असून तिची दुरुस्ती महामार्गाचे ठेकेदार प्रतिनिधी श्री. शहा, राष्ट्रीय महामार्गाचे कनिष्ठ अभियंता वैभव आंबोवकर यांनी सर्व कामे गणेशोत्सवापूर्वी करण्याचे आश्वासन लेखी स्वरूपात दिले आहे.
पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छता मोहीम, सार्वजनिक सुविधा, नियमित पुरेसा विद्युत पुरवठा, महामार्गावरील एसटीचे थांबे चे ठिकाण निश्चित करून वाहतूक नियोजन, गणेशोत्सवादरम्यान होणारी गर्दी आणि नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना आदी विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
तसेच गणेशोत्सव काळात सावर्डे बाजारपेठेत नागरिकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी विविध विभागांनी समन्वय साधून तत्काळ कार्यवाही करावी, अशा सूचना उपस्थित अधिकाऱ्यांना करण्यात आल्या.
व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यापारी व नागरिकांच्या अडचणी मांडत आवश्यक सुविधांची मागणी केली.
बैठकीस राष्ट्रीय महामार्ग शासकीय विभाग, वीज महावितरण कनिष्ठ अभियंता आंबवडे, राज्य परिवहन रणजीत राजेशिर्के ग्रामपंचायत प्रशासन तसेच इतर संबंधित शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी चिपळूण पंचायत समिती सदस्य शौकत माखजनकर, ग्रामपंचायत सरपंच सौ. समीक्षा बागवे आणि ग्रा. प. सदस्य, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सूर्यकांत चव्हाण, सुधीर जाधव बाळू शेठ मोहिरे, अरुण वारे, उमेश पवार, संजय चव्हाण, देवराज गरगटे, सचिन बागवे, जमीर मुल्लाजी, नाना सावंत, बंधू सुर्वे, विनायक सावंत, अजित कोकाटे, मैनुद्दीन खलपे, संदीप खेराडे आदी ग्रामस्थ पदाधिकारी आणि विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
त्यांनीही विविध सुविधांवर आपली मते मांडली. गणेशोत्सव काळात सावर्डे परिसर स्वच्छ, सुरक्षित व सुविधायुक्त राहावा यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याचा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला. नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडवून उत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे यावेळी सांगण्यात आले.













