ज्ञानदीप बालभवनमध्ये दहीहंडी उत्साहात; राधा-कृष्ण वेशातील विद्यार्थ्यांनी वेधले लक्ष

खेड, प्रतिनिधी : ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ, खेड-रत्नागिरी संचालित ज्ञानदीप बालभवन, भडगाव येथे श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने दहीहंडीचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृती, परंपरा आणि विविध सणांची माहिती मिळावी, या उद्देशाने प्रशालेत वर्षभर विविध सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन केले जाते.
दहीहंडी कार्यक्रमासाठी नर्सरीपासून मोठ्या गटातील विद्यार्थ्यांनी राधा-कृष्णाच्या वेशभूषेत सहभाग घेतला. या वेशभूषेमुळे बालभवन परिसरात आकर्षक आणि आनंदमय वातावरण निर्माण झाले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी उत्साहात नृत्य सादर केले. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम पार पडला. दहीहंडी फोडताना विद्यार्थ्यांनी मोठा जल्लोष करत या उपक्रमाचा मनमुराद आनंद घेतला. कार्यक्रमानंतर सर्व विद्यार्थ्यांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाचे नियोजन आणि आयोजन प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. पूर्वा मोरे, स्पर्धा व उपक्रम प्रमुख श्रीमती सुनयना सावंत, सौ. राधा भालेकर, सौ. अश्विनी दांडेकर आणि सौ. नेहा सुर्वे यांनी केले.
कार्यक्रमातील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग पाहून संस्थेचे अध्यक्ष श्री. अरविंद तोडकरी, उपाध्यक्ष डॉ. रमणलाल तलाठी, सरचिटणीस श्री. माधव पेठे, खजिनदार श्री. विनोद बेंडखळे, विश्वस्त श्री. पेराज जोयसर, जनसंपर्क अधिकारी श्री. दीपक लढ्ढा, संस्थापक सरचिटणीस श्री. प्रकाश गुजराती, संस्थापक सदस्य श्री. भालचंद्र कांबळे, श्री. चंदन पाटणे, श्री. प्रफुल्ल महाजन, श्री. अनिल शिवदे, श्री. रुपल पाटणे तसेच सल्लागार मंडळ सदस्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. प्रशालेचे प्राचार्य श्री. राजकुमार मगदूम तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य केले.