खेड (प्रतिनिधी) :
घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (GIT), लवेल येथे रासायनिक अभियांत्रिकी विभागाच्या वतीने व IIChE स्टुडंट चॅप्टरच्या सहकार्याने तसेच घरडा केमिकल्स लिमिटेडच्या पाठबळाने १६ सप्टेंबर २०२५ रोजी डॉ. के.एच. घरडा मेमोरियल राष्ट्रीय स्तरावरील क्विझ स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. रासायनिक अभियांत्रिकी क्षेत्रातील दूरदर्शी नेते व अभियांत्रिकी शिक्षणातील नवोपक्रमांचे प्रणेते डॉ. के.एच. घरडा यांच्या स्मृतीस अर्पण केलेला हा उपक्रम होता.
या कार्यक्रमाचे उद्घाटन घरडा केमिकल्स लिमिटेड, लोटे यांचे एचआर प्रमुख श्री. धीरज जाधव यांच्या हस्ते झाले. प्रमुख अतिथी म्हणून प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ डॉ. ए.बी. मराठे उपस्थित होते. या सोहळ्यास प्राचार्य डॉ. पी.बी. पाटील, प्रॅक्टिस प्राध्यापक श्री. गिरीश दंडीगे, क्विझचे संयोजक डॉ. एस.पी. टेकाडे व रासायनिक अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. एस.जे. कुलकर्णी यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
या स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयांमधून तब्बल २० टीम्सनी उत्साहाने सहभाग नोंदवला. त्यात दत्ता मेघे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, नवी मुंबई, सिंघगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पुणे, डी.वाय. पाटील इंजिनिअरिंग कॉलेज, पुणे, स्रीमती गीता डी. टटकरे पॉलिटेक्निक, गोवे-कोलाड, थडोमल शाहानी इंजिनिअरिंग कॉलेज, मुंबई, भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, नवी मुंबई, फिनोलेक्स अकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी, रत्नागिरी, शिवाजीराव जोंधळे इंजिनिअरिंग कॉलेज, डोंबिवली, घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, लवेल, के.के. वाघ इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग एज्युकेशन अँड रिसर्च, नाशिक आणि शिवाजी विद्यापीठ स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, कोल्हापूर यांचा समावेश होता.
या क्विझमध्ये बहुपर्यायी प्रश्न, लघुउत्तरे, रॅपिड फायर व दृश्यात्मक प्रश्नांचा समावेश होता. या सर्व टप्प्यांमधून विद्यार्थ्यांच्या रासायनिक अभियांत्रिकीसह संबंधित विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील ज्ञानाचा कस लागला.
या स्पर्धेतील अंतिम फेरीत शिवाजीराव जोंधळे इंजिनिअरिंग कॉलेज, डोंबिवली येथील टीमने उत्कृष्ट कामगिरी करत पहिले बक्षीस ₹२५,००० मिळवले. घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, लवेल येथील टीमने दुसरे बक्षीस ₹२०,००० पटकावले तर भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, नवी मुंबई येथील टीमने तिसरे बक्षीस ₹१५,००० जिंकले. विजेत्यांना बक्षिसे व प्रमाणपत्रे प्राचार्य डॉ. ए.बी. पाटील, डॉ. एस.पी. टेकाडे व डॉ. एस.जे. कुलकर्णी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.
या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनामागे रासायनिक अभियांत्रिकी विभागातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे अथक प्रयत्न आणि सहकार्य लाभले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये केवळ ज्ञानवृद्धी झाली नाही तर स्पर्धात्मक वातावरणात आत्मविश्वास, वेगवान विचारशक्ती व बौद्धिक क्षमता वृद्धिंगत करण्याची संधी मिळाली.











