कुडाळ:
व्यावसायिक ना-हरकत दाखला देण्यासाठी १२०० रुपये किमतीची खडा असलेली चांदीची अंगठी लाच म्हणून मागणाऱ्या आणि ती स्वीकारताना पकडल्यानंतर पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कुडाळ नगरपंचायतीच्या स्वच्छता निरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ ताब्यात घेतले आहे. पांडुरंग वासुदेव नाटेकर (वय ४७, रा. सालईवाडा सावंतवाडी) असे कारवाई करण्यात आलेल्या आरोपी लोकसेवकाचे नाव आहे. या प्रकरणी कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ४२ वर्षीय तक्रारदाराने कुडाळ नगरपंचायत हद्दीमध्ये ‘ज्वेलर्स’ व्यवसाय सुरू करण्यासाठी ना-हरकत दाखला मिळण्याबाबत ६ जुलै २०२६ रोजी अर्ज केला होता. २७ ऑगस्ट २०२६ रोजी तक्रारदार दाखला घेण्यासाठी नगरपंचायत कार्यालयात गेले असता स्वच्छता निरीक्षक पांडुरंग नाटेकर यांनी दाखला देण्याच्या बदल्यात १२०० रुपये किमतीची नवीन खडा असलेली चांदीची अंगठी लाच म्हणून मागितली. या प्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सिंधुदुर्ग युनिटकडे तक्रार नोंदवली होती.
तक्रारीच्या आधारे २७ ऑगस्ट रोजीच पंचांसमक्ष करण्यात आलेल्या पडताळणीत स्वच्छता निरीक्षक नाटेकर यांनी अंगठीची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर ४ सप्टेंबर २०२६ रोजी नगरपंचायत कुडाळ येथे सापळा रचण्यात आला. कारवाईदरम्यान तक्रारदाराने आरोपी नाटेकर यांची भेट घेऊन त्यांना १२०० रुपये किमतीची नवीन खड्याची चांदीसारख्या धातूची अंगठी दिली. नाटेकर यांनी ही अंगठी स्वीकारली; मात्र कारवाईचा संशय आल्याने त्यांनी स्वतःचा बचाव करण्यासाठी सदर अंगठी कुठेतरी लपवून ठेवून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.
तथापि, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने तत्परता दाखवत दुपारी २:३० वाजताच्या सुमारास संशयित आरोपीला ताब्यात घेतले. तपासणीदरम्यान आरोपीच्या हाताच्या बोटांवर अँथ्रोसिन पावडर स्पष्टपणे दिसून आली आहे. या प्रकरणी आरोपीविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ (सुधारणा २०१८) चे कलम ७ आणि भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २३८ अन्वये कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक शिवराज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक भागवत सोनवणे व सुहास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग युनिटचे पोलीस निरीक्षक दीपक माळी, पोलीस उपअधीक्षक संगीता पाटील, तसेच अमलदार कदम, देसाई, जगताप, खोत आणि राऊळ यांच्या पथकाने केली.
दरम्यान, कोणत्याही शासकीय कामासाठी लाच मागितल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सिंधुदुर्ग कार्यालयाशी (०२३६२-२२२२८९ / व्हॉट्सॲप ९९२२८९१०६४), ठाणे परिक्षेत्र कार्यालयाशी (०२२-२५४२७९७९) किंवा टोल फ्री क्रमांक १०६४ वर संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.













