कुडाळ : प्रतिनिधी
बांधकाम व्यवसायिकांना विविध पातळ्यांवर काम करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. अशा सर्व प्रश्नांचे क्रेडाई महाराष्ट्राच्या माध्यमातून निश्चितच निराकरण केले जाईल, असा विश्वास क्रेडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रफुल तावरे यांनी व्यक्त केला. क्रेडाई सिंधुदुर्गच्या यजमानपदाखाली क्रेडाई महाराष्ट्र साउथ वेस्ट झोनची चौथी सभा कुडाळ येथील हॉटेल लेमनग्रास येथे उत्साहात पार पडली. कार्यक्रमाचे उद्घाटन क्रेडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रफुल तावरे, उपाध्यक्ष विद्यानंद बेडेकर व जयंत ठक्कर, राज्य कार्यकारिणी सदस्य रसिक चौहान, सुरेंद्र भोईटे, दशरथ शेट्ये, शहाजी पाटील तसेच क्रेडाई सिंधुदुर्गचे अध्यक्ष गजानन कांदळगावकर, सचिव अभिजित जैतापकर व खजिनदार अनिल साखळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत दीपप्रज्वलनाने झाले. या परिषदेला सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे आदी जिल्ह्यांतील १६ क्रेडाई सिटी असोसिएशन्समधील सुमारे १६० बिल्डर्स व डेव्हलपर्स उपस्थित होते. बांधकाम व्यवसायाशी संबंधित नवीन कायदे, नियम, लेखापाल विषयक बदल, विविध शहरांतील स्थानिक अडचणी आणि त्यावरील प्रभावी उपाययोजना यावर चर्चा करून सदस्यांना अद्ययावत मार्गदर्शन करणे हा सभेचा मुख्य उद्देश होता. यावेळी प्रफुल तावरे यांनी प्रत्येक झोनमध्ये अशा बैठका नियमितपणे आयोजित होणे आवश्यक असल्याचे सांगितले. विविध शहरांमध्ये विमानतळ, कारागृह, नियोजन यांसह अनेक स्थानिक प्रश्न आहेत. अशा बैठकीच्या माध्यमातून हे प्रश्न मांडून त्यावर प्रभावी तोडगा काढता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. क्रेडाई महाराष्ट्राची पुढील जनरल बॉडी मीटिंग २७ सप्टेंबर रोजी होणार असून, सर्व सदस्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच स्टडी टूरअंतर्गत पहिली भेट बेंगळुरू येथे तर दुसरी चीन येथे आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. सभेत विविध तज्ज्ञांनी महत्त्वपूर्ण विषयांवर मार्गदर्शन केले. अॅड. रोहित इरंडे (पुणे) यांनी ‘सोसायटी अँड अपार्टमेंट अॅक्ट, अनुपालन, आव्हाने व सर्वोत्तम पद्धती’ या विषयावर मार्गदर्शन केले. सीए शिवराज पाटील यांनी ‘योग्य व्यवसाय रचना निवड, एलएलपी, कंपनी की प्रोप्रायटरशिप?’ या विषयावर व्यवसायासाठी योग्य रचना निवडण्याबाबत माहिती दिली. सीए मंगेश घाणेकर (ठाणे) यांनी ‘कॉर्पोरेटीकरण, संस्थेची कार्यक्षमता व वाढ’ या विषयावर संस्थात्मक व्यवस्थापन, कार्यक्षमता आणि व्यवसायवृद्धीबाबत मार्गदर्शन केले. प्रास्ताविकात क्रेडाई सिंधुदुर्गचे अध्यक्ष गजानन कांदळगावकर यांनी संघटनेच्या कार्याचा व वाटचालीचा आढावा घेतला. सचिव अभिजित जैतापकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल्ल वालावलकर यांनी केले.












