नेहरू हॉकी स्पर्धेत देवरूखमधील पाध्ये इंग्लिश मीडियम स्कूलला विजेतेपदाचा सन्मान

देवरूख (प्रतिनिधी):

देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाच्या स्वर्गीय श्रीम. अरुंधती अरुण पाध्ये इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स, देवरुखच्या हॉकी संघाने नेहरू हॉकी स्पर्धेत विजेतेपदाचा सन्मान पटकावून प्रशालेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. संघातील खेळाडूंनी संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट सांघिक खेळ, शिस्त, जिद्द, मेहनत आणि क्रीडाभावना यांचे दर्शन घडवत दमदार कामगिरी केली. या यशाबद्दल प्रशालेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षा ॲड. वेदा प्रभुदेसाई, सी. ई. ओ. नितीन शेडगे, मुख्याध्यापिका सोनाली नारकर आणि दीक्षा खंडागळे यांनी विजेत्या संघाचे व मार्गदर्शकांचे अभिनंदन केले.

प्रशालेच्या यशस्वी संघात रुद्र जाधव(कर्णधार), रुद्र कांगणे(उपकर्णधार), अधिराज जाधव, पुष्कर बांटे, विनम्र जाधव, प्रेम अडबल, यथार्थ खामकर, दर्श दर्डे, जय गोवरे, असदअली प्रभुवळकर, आर्यन सावंत, सिफान शिरगावकर, तोहीद साटविलकर या खेळाडूंचा समावेश आहे. सदर स्पर्धेचे आयोजन मीनाताई ठाकरे हायस्कूल, साडवली येथे करण्यात आले होते. हॉकी स्पर्धेतील पहिल्या रोमहर्षक सामन्यात पाध्ये प्रशालेच्या संघाने ठाकरे हायस्कूल, साडवलीचा अटीतटीच्या लढतीत १-० असा पराभव केला. तर अंतिम सामन्यात न्यू इंग्लिश स्कूल, देवरुखचा २-१ असा पराभव करून अंतिम विजेतेपद प्राप्त केले. अंतिम सामन्यात पाध्ये प्रशालेच्या संघातील अधिराज कदम यांनी केलेल्या उत्कृष्ट खेळासाठी संघाचे प्रशिक्षक निखिल कोळवणकर यांनी रोख रुपये ५००/- बक्षीस देऊन कौतुक केले. पाध्ये प्रशालेच्या संघाला प्रशिक्षक निखिल कोळवणकर व क्रिडा शिक्षक प्रतिक किर्वे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.