सावंतवाडी:
विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागावा आणि त्यांच्या विचारांचे मंथन व्हावे या उद्देशाने राज्य विज्ञान शिक्षण संस्था, नागपूर व शिक्षण विभाग (माध्यमिक), जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने कसाल येथील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात जिल्हास्तरीय अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यातील वक्तृत्व स्पर्धेत सावंतवाडी येथील राणी पार्वतीदेवी (RPD) हायस्कूलची इयत्ता १० वीची विद्यार्थिनी कु. जान्हवी विश्वास पाटील हिने उत्तुंग यश मिळवत जिल्ह्यात द्वितीय क्रमांक पटकावला आहे. या यशासह तिची विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या स्पर्धेत जान्हवीने ‘भारतीय ऊर्जाक्षेत्रे २०४७ – संधी आणि आव्हाने’ या विषयावर अत्यंत अभ्यासपूर्ण व प्रभावी वक्तृत्व सादर केले. तिच्या या यशाबद्दल आणि शाळेचा नावलौकिक वाढवल्याबद्दल सर्व स्तरांतून तिचे कौतुक होत आहे.
तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल शिक्षण प्रसारक मंडळ, सावंतवाडीचे अध्यक्ष श्री. विक्रांत विकासभाई सावंत, उपाध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर, सचिव श्री. व्ही. बी. नाईक, खजिनदार श्री. सी. एल. नाईक, शाळा समिती अध्यक्ष श्री. अमोल सावंत आणि सर्व संस्था सदस्यांनी तिचे अभिनंदन केले.
तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. सुमेधा नाईक, उपप्राचार्य श्रीम. एस. आय. कांबळे, पर्यवेक्षक श्री. एन. जी. मुठे, मार्गदर्शक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि पालक-शिक्षक संघ यांनी जान्हवी, तिचे पालक व मार्गदर्शक शिक्षकांचे विशेष अभिनंदन करून तिला पुढील विभागस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.













