१८ विसर्जन घाटांवर स्वच्छता; ७ वाहनतळ निश्चित, आपत्ती व्यवस्थापन कक्षासह सुरक्षेच्या उपाययोजना
देवगड : प्रतिनिधी
आगामी गणेश चतुर्थी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर देवगड-जामसंडे शहरातील नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित आणि सुव्यवस्थित वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी नगरपंचायतीमार्फत विविध उपाययोजनांची तयारी करण्यात आली आहे. याबाबत ७ सप्टेंबर रोजी विशेष सभा घेऊन संबंधित विभागांच्या समन्वयाने करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. यासंदर्भात देवगड-जामसंडे नगरपंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी हरिदत्त माने यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील १७ प्रभागांमध्ये स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली असून, प्रत्येक प्रभागासाठी स्वतंत्र सफाई कर्मचारी नियुक्त करण्यात आला आहे. शहरातील पायवाटा, काँक्रीट रस्ते तसेच इतर सार्वजनिक ठिकाणी वाढलेले शेवाळ काढून ब्लिचिंग पावडरच्या सहाय्याने स्वच्छता केली जात आहे. शहरातील एकूण १८ गणेश विसर्जन घाटांवरही स्वच्छतेची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. विसर्जन घाटांकडे जाणारे पोहोच रस्ते, पायवाटा व परिसराची साफसफाई करून आवश्यक त्या ठिकाणी ब्लिचिंग पावडरचा वापर करण्यात येत आहे.
गणेश विसर्जनाच्या दिवशी प्रत्येक विसर्जन घाटावर नगरपंचायतीचे कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत. गणेशमूर्ती विसर्जनानंतर निर्माण होणारे निर्माल्य स्वतंत्र निर्माल्य कलशामध्ये जमा करण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच धोकादायक व संवेदनशील विसर्जन ठिकाणी जीवरक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पथदिवे दुरुस्ती, आपत्ती व्यवस्थापन कक्षाची स्थापना
शहरातील बंद असलेले पथदिवे दुरुस्त करून कार्यान्वित करण्याची कार्यवाही सुरू असून, गणेशोत्सवापूर्वी पथदिवे दुरुस्तीचे काम पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. गणेशोत्सव कालावधीत उद्भवणाऱ्या संभाव्य आपत्कालीन परिस्थितीचा तत्काळ सामना करण्यासाठी नगरपंचायत कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन करण्यात येणार असून, त्याठिकाणी आवश्यक कर्मचारी नियुक्त करण्यात आला आहे.
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ७ वाहनतळ
गणेशोत्सव कालावधीत शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी एकूण ७ वाहनतळांच्या जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. तसेच आठवडा बाजाराच्या दिवशी होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी विशेष वाहतूक नियोजन करण्यात आले असून, देवगड-ब्राह्मणदेववाडी मार्गे एकेरी वाहतूक व्यवस्था निश्चित करण्यात आली आहे.
वीज, आरोग्य व पोलीस बंदोबस्ताची तयारी
गणेशोत्सव कालावधीत शहरातील वीजपुरवठा सुरळीत व अखंडित राहण्यासाठी महावितरण कंपनीला आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. त्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन संबंधित अधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहे.
गणेशोत्सव काळात गर्दीच्या ठिकाणी नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आरोग्य विभागामार्फत आवश्यकतेनुसार आरोग्य पथक नियुक्त करण्यात येणार असल्याचे संबंधित विभागामार्फत सांगण्यात आले. तसेच शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलीस विभागामार्फत आवश्यक संख्येने पोलीस बंदोबस्त नियुक्त करण्यात येणार आहे. वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त बाहेरून मागविण्यात आला असल्याची माहिती पोलीस विभागामार्फत देण्यात आली.
धोकादायक झाडीची कटाई पूर्ण
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रतिनिधींनी शहरातून जाणाऱ्या राज्य मार्गालगत महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीतील धोकादायक झाडी व गवत कटाईचे काम करण्यात आल्याचे सांगितले. तसेच रस्त्याच्या साईडपट्टीवर आवश्यकतेनुसार भराव टाकण्यात येणार असून, आवश्यक त्या ठिकाणी रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
गणेशोत्सव हा शहरातील नागरिकांसाठी आनंद, श्रद्धा व उत्साहाचा सण असून, उत्सवाच्या कालावधीत नागरिकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, वाहतूक सुरळीत राहावी, स्वच्छता व आरोग्य व्यवस्था सक्षम राहावी तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी देवगड-जामसंडे नगरपंचायतीमार्फत संबंधित सर्व विभागांच्या समन्वयाने आवश्यक ती पूर्वतयारी व कार्यवाही करण्यात येत असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी हरिदत्त माने यांनी स्पष्ट केले.
नगरपंचायतीच्या वतीने सर्व गणेशभक्त व नागरिकांना नगरपंचायतीने निश्चित केलेल्या वाहनतळांमध्येच वाहने पार्क करावीत, रस्त्यावर वाहने उभी करून रहदारीस अडथळा निर्माण करू नये, तसेच स्वच्छता, सुरक्षितता व पर्यावरणपूरक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.













