तळवडे-निरूस्तेवाडीत पोलिसांचा ‘अंदर-बाहेर’ जुगारावर छापा

​​४ लाख ७१ हजारांच्या मुद्देमाल जप्त : १० जणांवर कारवाई

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कामगिरी
​
सावंतवाडी । प्रतिनिधी :
तळवडे-निरूस्तेवाडी येथील आंगचेकर गॅरेजच्या पाठीमागे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (LCB) पथकाने बुधवारी रात्री उशिरा धाड टाकली. या कारवाईत पोलिसांनी मुख्य आरोपी रवींद्र विनायक लोके याच्यासह एकूण १० जणांना ताब्यात घेतले असून, ४ लाख ७१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ जानेवारी रोजी रात्री ९ ते ११ च्या सुमारास तळवडे-निरूस्तेवाडी येथील आंगचेकर यांच्या गॅरेजपासून सुमारे २०० मीटर अंतरावर, चार्जिंग बल्बच्या उजेडात उघड्या जागेवर ‘अंदर-बाहेर’ नावाचा जुगार खेळला जात होता. आरोपी रवींद्र लोके हा परिसरातील १० लोकांना जमवून त्यांच्याकडून पैसे लावून जुगार खेळवत असल्याची खात्रीशीर माहिती एलसीबीला मिळाली होती.

पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकला असता, तिथे २१ हजार रुपये रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य मिळून आले. तसेच आरोपींनी घटनास्थळी आणलेल्या ७ मोटार सायकलीही पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. रोख रक्कम आणि वाहने असा एकूण ४ लाख ७१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई सिंधुदुर्गचे पोलीस अधीक्षक आणि अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. कोल्हे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली. या पथकात पीएसआय सुधीर सावंत, जमादार सुरेश राठोड, हवालदार प्रकाश कदम, गोसावी, डिसोजा, गंगावणे, तवटे आणि समजिस्कर यांचा समावेश होता. ​याप्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहेत. या कारवाईमुळे परिसरात अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.