गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे सज्ज; प्रवाशांच्या सोयीसाठी विशेष व्यवस्था

विशेष रेल्वे गाड्यांसह वैद्यकीय सुविधा, प्रवासी सहाय्य केंद्रे आणि गर्दी नियंत्रणाची तयारी

स्थानकांवर सांस्कृतिक कार्यक्रमांसह सेल्फी पॉइंट, आकर्षक रोषणाई; प्रवाशांना मोफत पाणी व आरोग्य सुविधा

कोकण : प्रतिनिधी

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात मोठ्या संख्येने येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी कोकण रेल्वेने व्यापक तयारी केली आहे. सुरक्षित, सुरळीत आणि आरामदायी प्रवासासाठी विशेष रेल्वे सेवा, वैद्यकीय सुविधा, प्रवासी सहाय्य केंद्रे, गर्दी नियंत्रण तसेच स्थानकांवरील विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. गणेशोत्सवाच्या काळात मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेच्या समन्वयाने विशेष गाड्या चालविण्यात येणार असल्याची माहिती कोकण रेल्वेने १० सप्टेंबर रोजी प्रसिद्ध केलेल्या पत्रकाद्वारे दिली आहे.

वाढीव प्रवासी वाहतूक लक्षात घेऊन उधना जंक्शन, विश्वामित्री, वलसाड, वडोदरा जंक्शन, नागपूर जंक्शन, मुंबई सेंट्रल, मुंबई सीएसएमटी, लोकमान्य टिळक टर्मिनस, वांद्रे टर्मिनस, दिवा, पनवेल आणि चिपळूण, रत्नागिरी, कुडाळ, सावंतवाडी रोड, मडगाव जंक्शन तसेच ठोकूर या स्थानकांदरम्यान विशेष रेल्वे सेवा चालविण्यात येणार आहे.

वैद्यकीय सुविधांसह रुग्णवाहिकांची व्यवस्था

प्रवाशांच्या आरोग्याची काळजी घेत माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी रोड या स्थानकांवर १२ सप्टेंबरपासून प्रथमोपचार केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. राज्य आरोग्य विभागाच्या समन्वयाने या केंद्रांवर निमवैद्यकीय कर्मचारी उपलब्ध असतील. चिपळूण आणि रत्नागिरी येथील आरोग्य केंद्रांवर वैद्यकीय अधिकारी, परिचारिका तसेच बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी आपत्कालीन परिस्थितीसाठी उपलब्ध राहणार आहेत.

प्रमुख स्थानकांवर मोफत आरोग्य तपासणी, आरोग्य जनजागृती आणि रक्तदान शिबिरे आयोजित केली जाणार असून रक्तातील साखर आणि रक्तदाब तपासणीसाठी वैद्यकीय बूथही उपलब्ध असतील. आपत्कालीन परिस्थितीत शासकीय तसेच संबंधित रुग्णालयांच्या रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

प्रवाशांसाठी विशेष सुविधा

गाड्यांच्या आगमन आणि प्रस्थानाच्या वेळी खाद्यपदार्थ व अल्पोपाहार पुरेशा प्रमाणात उपलब्ध राहावेत, यासाठी सर्व खाद्यपदार्थ विक्री केंद्रे सुरू ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तिकीट खिडक्यांवर विशेष रांगेची व्यवस्था करण्यात आली आहे. माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड आणि सावंतवाडी रोड येथे पूर्वमुद्रित यूटीएस तिकिटांची व्यवस्था करण्यात येणार असून यूटीएस तिकिटांसाठी पीआरएस काऊंटरचाही वापर केला जाणार आहे.

रत्नागिरी, कणकवली आणि कुडाळ स्थानकांवर एम-यूटीएस सहाय्यक सुविधा उपलब्ध असतील. माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवीम आणि करमळी येथे रेल यात्री सहायता केंद्रे २४ तास कार्यरत राहणार असून प्रवाशांच्या मदतीसाठी स्वतंत्र पर्यवेक्षक नियुक्त केले जाणार आहेत.

प्रवाशांची मोठी गर्दी झाल्यास माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी रोड येथे होल्डिंग एरिया निश्चित करण्यात येणार आहेत. सर्व स्थानकांवर नियमित घोषणांसोबत गणपती उत्सवाच्या विशेष घोषणाही करण्यात येतील. पुढील प्रवासासाठी स्थानकांवर बस उपलब्ध करून देण्यासाठी कोकण रेल्वे आणि एसटी महामंडळ समन्वय साधणार आहे.

प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी स्थानकांवर आणि रेल्वेगाड्यांमध्ये विशेष तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. स्थानकांमध्ये स्वच्छता राखण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळही तैनात केले जाणार आहे.

गर्दी नियंत्रणासाठी सुरक्षा यंत्रणा सज्ज

गणेशोत्सवाच्या काळात स्थानकांवर आणि रेल्वेगाड्यांमध्ये प्रवाशांची गर्दी सुरळीतपणे नियंत्रित करण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी पुरेसा बंदोबस्त ठेवण्यात येणार असून सीसीटीव्ही यंत्रणेद्वारे २४ तास देखरेख केली जाणार आहे. रेल्वे सुरक्षा दल स्थानिक पोलिसांच्या समन्वयाने प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी काम करणार आहे.

स्थानकांवर गणेशोत्सवाचा उत्साह

प्रवाशांच्या सुविधा आणि सुरक्षिततेसोबतच स्थानकांवर गणेशोत्सवाचा आनंदी माहोल निर्माण करण्यासाठीही विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहेत. स्थानकांवर पूजा साहित्य, सजावटीच्या वस्तू, ताजी फळे, फुले, काजू मोदक तसेच विविध ब्रँडच्या प्रचारासाठी स्टॉल्स उभारण्यात येणार आहेत.

माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड या स्थानकांवर स्थानिक कलाकारांना कला सादरीकरणासाठी विनामूल्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. संगीत कार्यक्रम, भजने, जाखडी, कळसूत्री बाहुल्यांचे खेळ, कराओके आणि अन्य सांस्कृतिक कार्यक्रम येथे आयोजित करता येणार आहेत. स्थानिक कलाकारांनी यासाठी संबंधित स्टेशन मास्तरांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

स्थानकांवर विशेष गणेशोत्सव सेल्फी पॉइंट, आकर्षक रांगोळी आणि रोषणाई करण्यात येणार आहे. ड्रोनच्या माध्यमातून पुष्पवृष्टीसह स्वागत, बँडवादन तसेच लहान मुलांसाठी फुगे आणि रंगीत खडू देऊन विशेष स्वागत करण्यात येणार आहे. स्वयंसेवी संस्था आणि खासगी संस्थांच्या सहकार्याने वैद्यकीय शिबिरे तसेच प्रवाशांसाठी मोफत पाण्याच्या बाटल्यांची व्यवस्था केली जाणार आहे.

गणेशोत्सवातील प्रवास सुरक्षित आणि आरामदायी राहण्यासाठी प्रवाशांनी स्वच्छता व शिस्त राखण्यासाठी रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन कोकण रेल्वेने केले आहे. गणेशोत्सवाच्या काळात सुरक्षित रेल्वे वाहतूक, अखंडित प्रवासी सुविधा आणि सुरळीत प्रवास सुनिश्चित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत असल्याचे कोकण रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील बी. नरकर यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.