१०१ व्या वर्षात पदार्पण, भरगच्च धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
राजापूर (वार्ताहर): येथील ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ राजापूर या मंडळाची स्थापना १९२६ मध्ये झाली असून, यंदा मंडळ १०१ व्या वर्षात पदार्पण करत आहे. या निमित्ताने यंदाचा गणेशोत्सव ‘शतकपूर्ती महोत्सव’ म्हणून अत्यंत उत्साहात साजरा केला जाणार आहे.
यंदाच्या महोत्सवात दि. १३ सप्टेंबर ते २२ सप्टेंबर २०२६ या कालावधीत विविध धार्मिक, सामाजिक आणि मनोरंजनाचे कार्यक्रम पार पडणार आहेत. यंदाच्या महोत्सवात सौ. राधिका रमेश गुणे (भटाळी राजापूर) या मूर्तीदाता आहेत.
रविवार दि. १३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४:०० वाजता श्रींची भव्य आगमन मिरवणीने उत्सवाला प्रारंभ होणार आहे. यात श्री. जडयार हर्डी यांचा भजनमेळ, श्री धूतपापेश्वर नाडणकरवाडी, पवार मंडळ ढोलपथक धोपेश्वर यांचा सहभाग असेल. सोमवार दि. १४ सप्टेंबर रोजी सकाळी १०:०० वाजता श्रींची प्राणप्रतिष्ठापना केली जाईल. मंगळवार दि. १५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५:०० वाजता धोपेश्वर घाटी मित्रमंडळाची आरती आणि सायंकाळी ६:०० वाजता धूतपापेश्वर प्रासादिक भजन दिवटेवाडी यांचे भजन होईल. बुधवार दि. १६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४:०० वाजता सदिच्छा महिला वरचीपेठ यांचे भजन आणि रात्री ९:०० वाजता हनुमान मंडळ गुजराळी यांची आरती होईल.
गुरुवार दि. १७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७:०० वाजता श्री महापुरुष सेवा मंडळ वरचीपेठ यांची आरती होईल. तसेच रात्री ८:०० वाजता लहान मुलांसाठी संगीत खुर्ची, मेणबत्त्या पेटवणे, चमचा गोटी, फुगे सांभाळणे अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार दि. १८ सप्टेबर दुपारी २:०० वाजता श्री सत्यनारायण महापूजा होईल. दुपारी ४:०० ते रात्री ८:०० या वेळेत हळदीकुंकू व तीर्थप्रसाद वाटप होईल.
शनिवार दि. १९ सप्टेंबर रोजी रात्री ८:३० वाजता जलतरण स्पर्धा बक्षीस वितरण आणि रात्री ९:३० वाजता ‘स्वरनाद’ गाण्यांचा बहारदार कार्यक्रम होणार आहे. रविवार दि. २० सप्टेंबर रोजी सकाळी १०:०० ते दुपारी १:०० या वेळेत ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ आरोग्य शिबीर आयोजित केले आहे. तसेच सकाळी १०:३० वाजता लहान व मोठ्या गटासाठी चित्रकला स्पर्धा, संध्याकाळी ७:०० वाजता मनाचे श्लोक पठण स्पर्धा आणि रात्री ९:३० वाजता महिलांचा गुणदर्शन कार्यक्रम ‘गणरायाच्या अंगणी कलांचा उत्सव’ रंगणार आहे.
सोमवार दि. २१ सप्टेंबर या दिवशी विविध भजनांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ८:०० वाजता पुरुषांचे सहस्रावर्तन, सायंकाळी ४:०० वाजता समर्थ महिला भजन मंडळ यांचे भजन, संध्याकाळी ५:०० वाजता राधेश्याम भजनी मंडळ बाजारपेठ यांचे भजन, संध्याकाळी ६:०० वाजता पवार मंडळ दिवटेवाडी यांचे भजन, सायंकाळी ७:०० वाजता धूतपापेश्वर भजन मंडळ खंडेवाडी यांचे भजन आणि रात्री ८:०० वाजता हरडकरांचे ढोलावरचे भजन होईल. तसेच रात्री ९:०० वाजता विविध गुणदर्शन कार्यक्रम सादर केला जाईल.
मंगळवार दि. २२ सप्टेंबर रोजी दुपारी ३:०० वाजल्यापासून श्रींची भव्य सवाद्य विसर्जन मिरवणूक काढण्यात येईल. या मिरवणुकीत विविध भजन पथके, ढोल पथके आणि पारंपारिक युद्धकला प्रात्यक्षिके आकर्षण ठरणार आहेत. राजापूरच्या या ऐतिहासिक सोहळ्यात व शतकपूर्ती महोत्सवामध्ये सर्व भाविकांनी बहुसंख्येने उपस्थित राहून दर्शनाचा व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष महेश मयेकर व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ राजापूरतर्फे करण्यात आले आहे.
चौकट:
पुढील वर्षाच्या भाग्यवान मूर्तीदात्याची निवड करण्यासाठी ‘मूर्तीदाता योजना’ राबवली जात आहे. यासाठी चिठ्ठ्यांची पेटी मारुती मंदिर, धर्मशाळा येथे दि. १५ सप्टेंबर ते २१ सप्टेंबर २०२६ (सकाळी ११:०० वाजेपर्यंत) उपलब्ध असेल. या चिठ्ठीचे शुल्क ५० रुपये असून, भाग्यवान नाव विसर्जनापूर्वी गणेश विसर्जन घाटावर सोडत पद्धतीने जाहीर केले जाईल.












