सावंतवाडी:
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेतील अत्यंत महत्त्वाचा आणि उत्साहाचा सण असलेला गणेशोत्सव अधिकाधिक पर्यावरणपूरक, स्वच्छ व प्लास्टिकमुक्त पद्धतीने साजरा व्हावा, या उद्देशाने सावंतवाडी नगरपरिषदेमार्फत ‘माझी वसुंधरा अभियान ७.०’ व ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२६’ अंतर्गत “पर्यावरणपूरक घरगुती गणेशोत्सव रील्स स्पर्धा – २०२६” चे आयोजन करण्यात आले आहे.
गणेशोत्सवाचा उत्साह कायम ठेवत पर्यावरणाचे संरक्षण, स्वच्छता आणि सामाजिक जबाबदारीचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून नागरिक, युवक-युवती तसेच विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सवाबाबत जनजागृती करणाऱ्या आकर्षक व संदेशपर रील्स तयार करायच्या आहेत.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्धकांनी आपल्या रीलमध्ये सावंतवाडी नगरपरिषदेच्या @sundarwadisawantwadi या अधिकृत सोशल मीडिया खात्याला Tag करणे आवश्यक आहे. तसेच रील पोस्ट करताना #EcoGaneshotsav2026, #SawantwadiNagarparishad आणि #पर्यावरणपूरकगणेशोत्सव2026 हे हॅशटॅग (Hashtags) वापरणे बंधनकारक आहे.
या उपक्रमात शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश घराघरांत पोहोचवावा, असे आवाहन सावंतवाडी नगरपरिषदेच्या मा. नगराध्यक्षा, मा. उपनगराध्यक्ष, मा. मुख्याधिकारी, सर्व सभापती व सर्व नगरसेवकांनी केले आहे.












