सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघाची मागणी
सावंतवाडी । प्रतिनिधी :
महाराष्ट्रातील ग्रंथालयांचे थकीत अनुदान अद्यापही प्राप्त न झाल्याने येणाऱ्या गणेशोत्सव काळात ग्रंथपाल व इतर कर्मचाऱ्यांवर सण कसा साजरा करायचा असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर ग्रंथालयांचे अनुदान लवकरात लवकर मिळावे यासाठी शासन दरबारी तीव्र पाठपुरावा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघाच्या कार्यकारिणी बैठकीत घेण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे आणि आमदार दीपक केसरकर यांच्या कानी ही गंभीर बाब घालून अनुदानाचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचा ध्यास ग्रंथालय संघाने घेतला आहे.
कुडाळ येथील रा. ब. अनंत शिवाजी देसाई वाचनालय आणि ग्रंथ संग्रहालयाच्या सभागृहात शनिवारी सकाळी जिल्हाध्यक्ष मंगेश मस्के यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीला सचिव राजन पांचाळ, अनंत वैद्य, रुजारिओ पिंटो, संजय शिंदे, ॲड. संतोष सावंत, सतीश गावडे, गुरुनाथ मडवळ, ऋतुजा केळकर, भरत गावडे यांच्यासह इतर पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोकणात गणेश चतुर्थी हा सण अत्यंत थाटामाटात आणि महत्त्वाचा मानला जातो. या काळात ग्रंथालय कर्मचाऱ्यांना वेळेत वेतन मिळणे अत्यंत आवश्यक आहे. परंतु, शासनाकडून मिळणारे नियमित व वाढीव अनुदान अद्याप न मिळाल्यामुळे कर्मचाऱ्यांची आर्थिक अडचण झाली आहे. त्यामुळे मंत्री, आमदार आणि खासदारांच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधून हे अनुदान त्वरित मिळवून देण्यासाठी पाठपुरावा निश्चित करण्यात आला.
या बैठकीत केवळ अनुदानाचा प्रश्नच नव्हे, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रंथालय चळवळ अधिक गतीने विस्तारण्याबाबतही सविस्तर चर्चा होऊन विविध उपक्रम राबवण्याचा संकल्प करण्यात आला. बैठकीदरम्यान रुजारिओ पिंटो यांनी लिहिलेल्या ‘मेरी माँ’ या हिंदी पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते उत्साहात पार पडले. तसेच रा. ब. अनंत शिवाजी वाचनालयाच्या सचिवपदी मंगेश मस्के यांची निवड झाल्याबद्दल आणि ग्रंथालय पुरस्कार विजेते संजय शिंदे यांचे नाटक दिल्ली येथे सादर झाल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. प्रारंभी सचिव राजन पांचाळ यांनी ग्रंथालय संघाच्या आतापर्यंतच्या वाटचालीचा व कामाचा आढावा बैठकीत सादर केला.











