निलेश जाधव / देवरूख:
कोकणातील प्रसिद्ध समजल्या जाणाऱ्या संगमेश्वर तालुक्यातील देवरूख येथील पहिल्या मानाच्या गणरायांचे शनिवारी प्रतिपदेला अत्यंत पारंपरिक आणि मंगलमय वातावरणात सवाद्य मिरवणुकीने आगमन झाले आहे. साडेतीनशेहून अधिक वर्षांची परंपरा असलेल्या देवरूख वरची आळीतील पंतजोशी यांच्या चौसोपी वाड्यातील श्री सिद्धिविनायक मंदिरात या ऐतिहासिक गणेशोत्सवाला थाटामाटात प्रारंभ झाला आहे.
देवदेवतांना पांरपरिक पद्घतीने निमंत्रण देऊन भोंदे यांच्या श्री गणेशचित्रशाळेतून अश्वावर आरूढ श्री गणरायांचे वाजतगाजत आगमन झाले. गणरायांसोबत रिद्घी-सिद्घी, भालदार-चोपदार अशा स्वरूपात गणरायांचे आगमन झाले. नेहमीप्रमाणे आधुनिक डिजिटल डीजेंना फाटा देत, देवरुखच्या रस्त्यांवरून केवळ पारंपरिक वाद्यांच्या आणि ढोल-ताशांच्या साथीने ही भव्य आगमन मिरवणूक काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज चौक, बसस्थानक, बाजारपेठ, माणिक चौक ते सिद्घिविनायक मंदिर अशा मार्गाने मिरवणुकीने गणरायांचे आगमन झाले. देवदेवतांना पारंपरिक पद्धतीने रीतसर निमंत्रण दिल्यानंतर बाप्पाची वाड्यात विधीवत पूजन करून प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.
माणिक चौक येथील श्रीकांत जोशी यांच्या निवासस्थानी अश्वारूढ गणरायांचे आगमन झाले. जोशी घराण्यातील हे दोन मानाचे गणपती येतात व नंतर चतुर्थीला घरोघरी गणपतीचे आगमन होते. देवरुखमधील जोशी घराण्याचा हा गणेशोत्सव हुबेहूब मोरगावच्या गणेशोत्सवाच्या धर्तीवर साजरा केला जातो. प्रतिपदेलाच मानाच्या पहिल्या गणेश मूर्तीचे चौसोपी वाड्यात आगमन होत असल्यामुळे, मुख्य चतुर्थीच्या आधीच संपूर्ण देवरुख नगरीत भक्तीचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या सोहळ्यासाठी स्थानिक नागरिकांसह मुंबई-पुण्याहून आलेले चाकरमानी मोठ्या संख्येने उपस्थित होते. गणेशोत्सवाला उत्साहात सुरवात झाली असून बाजारपेठा फळे, सजावट, आरास सामानांनी फुलून गेल्या आहेत. चाकरमानीही मोठ्या संख्येने दाखल होऊ लागले आहेत.












