कणकवलीत वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर!

केवळ पोलीस तैनाती नव्हे, अधिकाऱ्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीची गरज

मुख्य बाजारपेठ असल्याने विविध मार्गांवरील वाहने सर्व्हिस रोडवर!

पार्किंगसह वाहतूक नियोजनाचा अभाव ठरतोय वाहतूक कोंडीला कारणीभूत!

कणकवली : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कणकवली शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शहरातील मुख्य बाजारपेठ, विविध दिशांनी येणाऱ्या मार्गांचे महत्त्वाचे नाके आणि मुंबई – गोवा महामार्गाला जोडणारे सर्व्हिस रोड यामुळे कणकवलीत दिवसभर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. त्यातच सणासुदीच्या काळात वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने वाहतूक व्यवस्थेवर अतिरिक्त ताण निर्माण होत आहे.

बुधवारी सायंकाळी कणकवली बसस्थानकासमोर बेशिस्त कार पार्किंगमुळे तब्बल पाऊण तास वाहतूक कोंडी झाली. जावली ब्रिजपासून बसस्थानकापर्यंत सर्व्हिस रोडवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. एसटी बस तसेच खासगी बसेसना मार्ग काढताना अडचणी निर्माण झाल्या. चौकाचौकात पोलीस आणि होमगार्ड तैनात असतानाही वाहतूक सुरळीत करण्यासाठी मोठी कसरत करावी लागली.

कणकवली शहराची भौगोलिक रचना आणि बाजारपेठेचे स्वरूप पाहता येथे विविध मार्गाने येणारी वाहने शहरातील नाक्यांवरून सर्व्हिस रोडवर येतात आणि त्यानंतर पुढील मार्गाने मार्गस्थ होतात. त्यामुळे सर्व्हिस रोड हा वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरतो. या ठिकाणी एखादे वाहन चुकीच्या पद्धतीने पार्क झाले किंवा वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली, तर त्याचा परिणाम काही मिनिटांतच मोठ्या परिसरातील वाहतुकीवर होताना दिसतो.

याच ठिकाणी वाहतूक नियंत्रणासाठी नेमलेले पोलीस हवालदार आणि होमगार्ड आपापल्या परीने वाहतूक सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न करताना दिसतात. मात्र, वाहनचालक आणि वाहतूक नियंत्रणासाठी तैनात कर्मचाऱ्यांमध्ये किरकोळ कारणांवरून वाद होण्याचे प्रकारही अधूनमधून घडताना दिसतात. गर्दीच्या काळात वाहनचालकांची घाई, पार्किंगचा प्रश्न आणि वाहतूक कर्मचाऱ्यांच्या सूचनांमुळे निर्माण होणारे मतभेद यामुळे परिस्थिती अधिक गुंतागुंतीची होऊ शकते.

अशा परिस्थितीत केवळ हवालदार किंवा होमगार्ड यांच्यावर वाहतूक नियंत्रणाची जबाबदारी सोपविण्यापेक्षा गर्दीच्या आणि वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असलेल्या महत्त्वाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांची प्रत्यक्ष उपस्थिती असणे आवश्यक ठरते. विशेषतः गणेशोत्सवासारख्या मोठ्या सणाच्या काळात शहरातील वाहतुकीचा वाढलेला भार लक्षात घेऊन संवेदनशील ठिकाणी अधिकाऱ्यांनी स्वतः उपस्थित राहून परिस्थितीवर लक्ष ठेवणे, वाहनचालकांना योग्य मार्गदर्शन करणे आणि आवश्यकतेनुसार तातडीने निर्णय घेणे गरजेचे आहे.

मात्र, कणकवली शहरातील वाहतूक व्यवस्थेकडे पाहता अशा महत्त्वाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांची प्रत्यक्ष उपस्थिती सातत्याने दिसून येत नसल्याची नागरिकांची भावना आहे. त्यामुळे तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांवरच अनेकदा संपूर्ण परिस्थिती हाताळण्याची जबाबदारी येते. परिणामी, वाहतूक कोंडी वाढल्यास परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी त्यांना मोठी कसरत करावी लागते.

दरम्यान, सध्या गणेशोत्सवासाठी मुंबईसह विविध भागांतून चाकरमानी आणि गणेशभक्त मोठ्या संख्येने सिंधुदुर्गात दाखल झाले आहेत. गौरी आवाहनाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांचीही मोठी गर्दी होत आहे. त्यामुळे पुढील काही दिवस कणकवली शहरातील वाहतुकीवर आणखी ताण येण्याची शक्यता आहे.

बसस्थानक परिसर, सर्व्हिस रोड, प्रमुख चौक तसेच शहरातील विविध नाक्यांवर वाहतूक नियोजन अधिक काटेकोर करण्याची गरज आहे. बेशिस्त पार्किंगवर कारवाई करण्याबरोबरच वाहनचालकांना योग्य ठिकाणी पार्किंगची सुविधा आणि मार्गदर्शन उपलब्ध करून देणे, गर्दीच्या वेळेत अतिरिक्त वाहतूक कर्मचारी तैनात करणे आणि महत्त्वाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांची प्रत्यक्ष उपस्थिती ठेवणे आवश्यक आहे.

गणेशोत्सवाच्या काळात कणकवली शहरात वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी केवळ कर्मचारी तैनात करून चालणार नाही, तर प्रत्यक्ष परिस्थितीवर लक्ष ठेवून तातडीने निर्णय घेणारी यंत्रणा रस्त्यावर दिसणे गरजेचे आहे. त्यामुळे आगामी गर्दीच्या दिवसांत वाहतूक विभाग आणि पोलिस प्रशासन याकडे किती गांभीर्याने पाहते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.