गुहागर प्रतिनिधी
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गुहागरमधील तरुणांनी आपल्या कलाकौशल्यातून दोन आगळ्यावेगळ्या संकल्पना साकारल्या आहेत. देवघर गावातील जागृत देवस्थान असलेल्या श्री स्वयंभू सप्तेश्वर मंदिरात होणाऱ्या पारंपरिक महाशिवरात्रीच्या देखाव्याची प्रतिकृती तसेच लहान मुलांसाठी ‘आले लाडके बाप्पा’ हे बालगीत यंदाच्या गणेशोत्सवाचे विशेष आकर्षण ठरत आहे.
सप्तेश्वर मंदिराचा लवकरच जीर्णोद्धार होणार असल्याने या ऐतिहासिक वास्तूची आठवण कायमस्वरूपी राहावी, या उद्देशाने प्रथमेश सकपाळ (KR Prathamesh) यांनी गणपतीसाठी या देखाव्याची संकल्पना साकारली आहे. मंदिरातील पारंपरिक महाशिवरात्रीचा देखावा गणेशमूर्तीसमोर साकारत त्यांनी देवस्थानाच्या आठवणींना कलात्मक स्वरूप दिले आहे.
याचबरोबर प्रथमेश सकपाळ यंदा ‘आले लाडके बाप्पा’ हे लहान मुलांसाठी खास बालगीत घेऊन आले आहेत. या गाण्यात गुहागर-चिपळूण परिसरातील बालकलाकारांसह अनेक कलाकार झळकले आहेत. वेदांत शितप (चिपळूणचा पोरगा वेदांत), अंकुश चांदे, तेजस कदम, बालकलाकार रूही मोरे, आयुशी चव्हाण आणि आरव चव्हाण यांनी या गाण्यात सहभाग घेतला आहे.
‘आले लाडके बाप्पा’ या गीताचे लेखन आणि संगीतबद्ध करण्याचे काम प्रथमेश सकपाळ यांनी केले आहे. संकेत गुजर यांनी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम पाहिले असून, निखिल अदवडे यांनी गाण्याचे चित्रीकरण केले आहे.
या दोन्ही कलात्मक संकल्पनांना प्रशांत अनंत शिंदे यांचे पाठबळ लाभले आहे. स्थानिक कलाकारांना व्यासपीठ देत आपल्या परिसरातील संस्कृती, परंपरा आणि देवस्थानाच्या आठवणी जपण्याचा हा प्रयत्न गुहागरच्या सांस्कृतिक क्षेत्रासाठी निश्चितच उल्लेखनीय ठरत आहे.












