एसटी बससेवेच्या नियोजनाचा घेतला आढावा
पोलीस ठाण्यातील शालेय जनजागृतीपर देखाव्याचे केले कौतुक
कणकवली : महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी कणकवली शहरातील विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेट देत श्री गणरायाचे दर्शन घेतले. कणकवली एसटी बस स्थानक, कणकवली ऑटो रिक्षा चालक-मालक संघटना, श्री विघ्नहर्ता मित्रमंडळ, कणकवली तसेच कणकवली पोलीस ठाणे येथील सार्वजनिक गणेशोत्सवांना ना. नितेश राणे यांनी भेट दिली.
कणकवली एसटी बस स्थानक येथे विराजमान असलेल्या श्री गणरायाची पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी पूजाअर्चा करून मनोभावे दर्शन घेतले. यावेळी कणकवली तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, शहराध्यक्ष अण्णा कोदे, कलमठ सरपंच संदीप मेस्त्री, नगरसेवक बंडू हर्णे, दीपक घोडे विभाग नियंत्रक, निलेश लाड, नगरसेवक राकेश राणे यांच्यासह एसटीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
एसटी बस स्थानकातील गणरायाचे दर्शन घेतल्यानंतर पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एसटी बस गाड्यांचे करण्यात आलेले नियोजन याबाबत थोडक्यात आढावा घेतला.
त्यानंतर कणकवली ऑटो रिक्षा चालक-मालक संघटनेच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला भेट देऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. यावेळी गणेशोत्सव मंडळाच्या वतीने ना. नितेश राणे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यानंतर श्री विघ्नहर्ता मित्रमंडळ, कणकवली यांच्या गणेशोत्सव मंडळाला भेट देऊन श्री गणपती बाप्पाचे दर्शन घेतले.
कणकवली पोलीस ठाण्यात विराजमान असलेल्या गणपती बाप्पाचेही ना. नितेश राणे यांनी दर्शन घेतले. यावेळी कणकवली पोलीस निरीक्षक कमलेश बच्छाव यांनी आपल्या सहकारी अधिकारी व कर्मचारी यांच्यासह पालकमंत्री ना. नितेश राणे यांचे स्वागत केले. पोलीस ठाण्यातील गणरायाचे दर्शन घेतल्यानंतर पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात आलेल्या शालेय जनजागृतीपर देखाव्याची पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी पाहणी केली. या देखाव्याचे त्यांनी कौतुक केले.
यावेळी पोलीस निरीक्षक कमलेश बच्छाव, सचिन माने, विनोद चव्हाण आदी पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.













