सावंतवाडी:
सावंतवाडी शहरातील मोती तलावाच्या काठावर असलेल्या पॉम्पस हॉटेलसमोर मंगळवारी एक भीषण अपघात घडला. चारचाकी आणि दुचाकी यांच्यात झालेल्या या जोरदार धडकेत दुचाकीस्वार तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. मिथिल भिसे ( वय ३०, रा. भटवाडी सावंतवाडी ) असे या अपघातात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मोती तलाव काठावरील रस्त्यावरून दुचाकी (क्र. MH07AV5873) आणि चारचाकी (क्र. MH01CH6280) जात असताना हा अपघात झाला. समोरून येणाऱ्या वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या घाईत चारचाकी चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ही धडक बसल्याचे प्रत्यक्षदर्शी स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे. अपघात इतका भीषण होता की दुचाकीचे मोठे नुकसान झाले असून मिथिल भिसे याच्या पायाला गंभीर दुखापत झाली.
अपघातानंतर घटनास्थळी स्थानिकांनी त्वरित धाव घेतली. गंभीर जखमी झालेल्या मिथिलला स्थानिकांच्या मदतीने उपचारासाठी तातडीने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे मोती तलाव परिसरात काही काळ खळबळ उडाली होती.











