मंडणगड प्रतिनिधी : ‘गावाकडची माती सोडू नका, गावाशी असलेली नाळ तोडू नका… खेड्याकडे चला! असा आशयपूर्ण संदेश देत पालघर वाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा साकारलेला भाताची उडवी बोलते हा जिवंत देखावा ग्रामीण जीवन संस्कृतीचे अनेक पदर उलगडणारा ठरत आहे. केवळ देखावा म्हणून नव्हे, तर बदलत्या जीवनशैलीत हरवत चाललेले निसर्ग स्नेही ग्राम परंपरांची आठवण करून देणारा आणि नव्या पिढीला आपल्या मातीशी जोडणारा वैचारिक उपक्रम म्हणून या देखाव्याकडे पाहिले जात आहे.
भाताची उडवी हा कोकणातील शेतीजीवनाचा केवळ एक भाग नाही, तर शेतकऱ्याच्या वर्षभराच्या परिश्रमाची साक्ष देणारी प्रतिकात्मक रचना आहे. याच संकल्पनेला केंद्रस्थानी ठेवून मंडळाने कोकणात पांकपारीक शेतीतील गवत काढणी, कवळ तोडणी, भाजवळ, शेतीची तयारी, गावातील सामूहिक लोकजीवन, सण उत्सव आणि माणुसकीच्या नात्यांपासून ते भाताची पेरणी, नांगरणी, लावणी, कापणी आणि मळणीपर्यंतचा संपूर्ण प्रवास साभिनय जिवंत केला आहे. शिमग्यापासून गणेशोत्सवापर्यंत संस्कृतीचा जागर देखाव्यातून कोकणातील पारंपरिक जीवनपद्धतीचा प्रवासही प्रभावीपणे मांडण्यात आला आहे. शिमगोत्सवाच्या माध्यमातून ग्रामदेवतेचे धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित केले आहे. त्यानंतर पेरणी, नांगरणीची लगबग, लावणीतील सामूहिक श्रम, श्रावणातील सणउत्सव, गणरायाचे आगमन, दसरा, दिवाळी आणि लग्नसराई अशा घटनांमधून गावच्या वर्षभराच्या जीवन चक्राचे जिवंत चित्र उभे केले आहे. अखेरीस कष्टाने पिकवलेल्या भाताची कापणी व मळणी या टप्प्यावर उडवीचा प्रवास पूर्णत्वाला जातो.
‘मुंबईला गेलेल्यांनी गावाकडे परतावे’ असा मातीचा संदेश;
रोजगाराच्या शोधात शहरांकडे स्थलांतरित झालेल्या अनेक कुटुंबांची गावाशी असलेली नाळ हळूहळू सैल होत आहे. याच वास्तवाला स्पर्श करत देखाव्यातून ‘खेड्याकडे चला’ अशी साद घालण्यात आली आहे. गाव म्हणजे केवळ शेती आणि घर नव्हे; तर सामूहिक जीवन, परंपरा, सणउत्सव, परस्परांची साथ, माणुसकी आणि निसर्गाशी असलेले नाते यांची समृद्ध वीण आहे, हा विचार देखाव्यातून मांडण्यात आला आहे.
परंपरेला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड;
केवळ जुन्या पद्धतींचे कौतुक न करता ग्रामीण अर्थव्यवस्थेला आधुनिकतेची जोड देण्याचा संदेशही मंडळाने दिला आहे. सेंद्रिय खतांचा वापर, आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि उपलब्ध साधनांचा योग्य वापर करून शेतीतून आर्थिक उन्नती साधता येते, हा सकारात्मक विचार देखाव्यातून मांडण्यात आला आहे. त्यामुळे परंपरा जपतानाच बदलत्या काळाशी जुळवून घेण्याची गरजही अधोरेखित झाली आहे.
बारकाव्यांतून उभे राहिले जिवंत गाव;
या देखाव्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्यातील बारकावे. ग्रामीण जीवनातील विविध वस्तू, शेतीची अवजारे, घरगुती वातावरण, सण-उत्सवांची मांडणी आणि शेतीच्या विविध टप्प्यांचे हुबेहूब चित्रण करताना मंडळाच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येक छोट्या गोष्टीकडे विशेष लक्ष दिले आहे. त्यामुळे देखावा पाहताना ‘गाव पाहतोय’ नव्हे, तर गाव जगतोय अशी अनुभूती येते. पालघरवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा हा उपक्रम ग्रामीण संस्कृतीच्या जतनाची आणि नव्या पिढीला तिच्याशी जोडण्याची गरज अधोरेखित करणारा ठरला आहे.











