श्रवणदोष असलेल्या व्यक्तीला मदतीचा हात; सामाजिक संवेदनशीलतेचे दर्शन
मंडणगड प्रतिनिधी : समाजातील गरजू व्यक्तींना मदतीचा हात देत त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने चिपळूण तालुक्यातील असुर्डे (खापरेवाडी) येथे सोमा नारायण खापरे यांना मोफत श्रवणयंत्राचे वाटप करण्यात आले. या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी, माणुसकी आणि सेवाभावाचा प्रत्यय आला. यावेळी भाजपा चिपळूण तालुका ग्रामीण अध्यक्ष उदय घाग, अनुसूचित जाती मोर्चा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष मंगेश मोहिते, चिपळूण तालुका ग्रामीण महिला तालुकाध्यक्षा वैष्णवी राजेशिर्के, ओबीसी सेल उत्तर रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष गणपत गावकर, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश घाग, रवि घाग तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र सावर्डे येथील गट प्रवर्तक शर्मिला भुवड उपस्थित होते.
श्रवणदोषामुळे दैनंदिन जीवनात अडचणींचा सामना करणाऱ्या व्यक्तींना आवश्यक साधने उपलब्ध करून देणे, हा केवळ मदतीचा उपक्रम नसून त्यांना अधिक सक्षम आणि स्वावलंबी बनविण्याच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे. अशा सेवाभावी उपक्रमांमुळे समाजात सहकार्याची भावना वृद्धिंगत होत असून, गरजू व्यक्तींना दिलासा मिळत आहे. या उपक्रमातून सामाजिक संवेदनशीलता आणि माणुसकी जपण्याचा प्रेरणादायी संदेश देण्यात आला.













