मुंबईला गेलेल्या वृद्ध महिलेच्या घरात चोरी ; वेंगुर्ले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
वेंगुर्ले : दाजी नाईक
तालुक्यातील दाभोली मोबारवाडी येथील घरातून अमेझॉन लॉकरसह तब्बल १९ लाख ७२ हजार रुपये किमतीचे ५१५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे व डायमंड बसवलेले दागिने अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी वेंगुर्ला पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सलोनी सुधीर लोलयेकर (वय ७२, रा. दाभोली-मोबारवाडी, ता. वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग, सध्या रा. अंधेरी, मुंबई) या दि. १८ जून २०२६ रोजी दुपारी १२.३० वाजता मुंबई येथे गेल्या होत्या. त्या दि. २१ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता घरी परतल्या. याच कालावधीत त्यांच्या दाभोली-मोबारवाडी येथील राहत्या घरात चोरी झाल्याचे समोर आले.
घरातील ड्रेसिंग रूममध्ये लाकडी बॉक्स रॅकमध्ये कपड्यांच्या मागे अमेझॉन लॉकर ठेवण्यात आले होते. या लॉकरमध्ये ५१५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने तसेच डायमंड बसवलेले दागिने, एकूण किंमत १९ लाख ७२ हजार रुपये, ठेवण्यात आले होते. अज्ञात व्यक्तीने घरातील लॉकरसहित हे दागिने चोरून नेले, असे लिलयेकर यांनी तक्रारीत नमूद केले आहे.
या प्रकरणी वेंगुर्ला पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. १६५/२०२६, BNS २०२३ चे कलम ३०५ अन्वये आज २३ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ४.५१ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अज्ञात असून त्याचा तपास सुरू आहे.
या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश कांबळे करीत आहेत.











