मडगाव-नागपूर विशेष गाडी १८ ऑगस्टपासून; गणपतीसाठी ८, १५ आणि २२ सप्टेंबरलाही धावणार
मडगाव-लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष गाडीला २३ ऑगस्टपासून सुरुवात; सिंधुदुर्गातील अनेक स्थानकांवर थांबा
मडगाव, १७ ऑगस्ट : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वेने दोन विशेष रेल्वेगाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. अतिरिक्त गर्दीचा निचरा करण्यासाठी तसेच गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांना अधिक सुविधा मिळाव्यात यासाठी या गाड्या मागणीनुसार चालविण्यात येणार आहेत.
मडगाव-नागपूर विशेष रेल्वे
गाडी क्रमांक ०११४० मडगाव जंक्शन-नागपूर जंक्शन विशेष मडगावहून प्रत्येक मंगळवारी रात्री ७ वाजता सुटणार आहे. अतिरिक्त गर्दीसाठी ही गाडी १८ ऑगस्ट, २५ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर २०२६ रोजी धावेल. तसेच गणपती विशेष म्हणून ८ सप्टेंबर, १५ सप्टेंबर आणि २२ सप्टेंबर २०२६ रोजीही ही गाडी धावणार आहे. नागपूरला ही गाडी दुसऱ्या दिवशी रात्री ९.२५ वाजता पोहोचेल.
परतीच्या प्रवासासाठी गाडी क्रमांक ०११३९ नागपूर-मडगाव विशेष नागपूरहून रात्री ११.४५ वाजता सुटणार आहे. अतिरिक्त गर्दीसाठी १९ ऑगस्ट, २६ ऑगस्ट आणि २ सप्टेंबर २०२६ रोजी, तर गणपती विशेष म्हणून ९ सप्टेंबर, १६ सप्टेंबर आणि २३ सप्टेंबर २०२६ रोजी ही गाडी धावणार आहे. मडगावला दुसऱ्या दिवशी पहाटे ५.३० वाजता पोहोचेल.
या गाडीला करमाळी, थिवीम, सावंतवाडी रोड, कुडाळ, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पनवेल, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, मलकापूर, अकोला, बडनेरा, धामणगाव, पुलगाव आणि वर्धा या स्थानकांवर थांबे असतील.
या गाडीला एकूण १९ डबे असून त्यात ३ थ्री टियर एसी, ८ स्लीपर, ६ जनरल आणि २ एसएलआर/डी डबे असतील.
मडगाव-लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष रेल्वे
गाडी क्रमांक ०१००४ मडगाव-लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष मडगावहून रविवारी दुपारी ४ वाजता सुटणार आहे. अतिरिक्त गर्दीसाठी ही गाडी २३ ऑगस्ट, ३० ऑगस्ट आणि ६ सप्टेंबर २०२६ रोजी, तर गणपती विशेष म्हणून १३ सप्टेंबर, २० सप्टेंबर आणि २७ सप्टेंबर २०२६ रोजी धावणार आहे. लोकमान्य टिळक टर्मिनसला दुसऱ्या दिवशी सकाळी ६.०५ वाजता पोहोचेल.
परतीच्या प्रवासासाठी गाडी क्रमांक ०१००३ लोकमान्य टिळक टर्मिनस-मडगाव विशेष सकाळी ७.५० वाजता सुटणार आहे. अतिरिक्त गर्दीसाठी २४ ऑगस्ट, ३१ ऑगस्ट आणि ७ सप्टेंबर २०२६, तर गणपती विशेष म्हणून १४ सप्टेंबर, २१ सप्टेंबर आणि २८ सप्टेंबर २०२६ रोजी ही गाडी धावेल. मडगावला दुसऱ्या दिवशी रात्री ११.४५ वाजता पोहोचेल.
या गाडीला करमाळी, थिवीम, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, नांदगाव रोड, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलवडे, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, सावर्डा, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पेण, पनवेल आणि ठाणे या स्थानकांवर थांबे असतील.
या गाडीमध्येही एकूण १९ डबे असून त्यात ३ थ्री टियर एसी, ८ स्लीपर, ६ जनरल आणि २ एसएलआर/डी डबे असतील.
गाड्यांचे सविस्तर थांबे आणि वेळापत्रक भारतीय रेल्वेच्या अधिकृत चौकशी संकेतस्थळावर उपलब्ध आहे. गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेता प्रवाशांनी या विशेष रेल्वे सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन कोकण रेल्वेकडून करण्यात आले आहे.












