आर्ट सर्कलची 27 ऑगस्टरोजी ‘स्वरभास्कर बैठक’ 

युवांसह गुरुतुल्य कलाकारांचेही होणार गायन

रत्नागिरी | प्रतिनिधी :  आर्ट सर्कलच्या प्रतिवर्षी होणाऱ्या उपक्रमांमधील एक महत्वाचा उपक्रम स्वरभास्कर बैठक रविवार 27 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी 4.30 ते रात्रौ 09.30 या वेळेत राधाबाई शेट्ये सभागृह, गोगटे जोगळेकर महाविद्यालय येथे आयोजित करण्यात आली आहे.

गुणी तरुण कलाकारांना शुद्ध शास्त्रीय संगीत सादर करण्यासाठी स्वरभास्कर बैठक हे हक्काचे व्यासपीठ आहे. कोरोना काळातही हा उपक्रम खंड न पाडता online साकार केला गेला. यंदा स्वरभास्कर बैठकीचे सलग 13वे वर्ष आहे. या उपक्रमात रत्नागिरीतील युवा गायक श्रीधर पाटणकर, गायिका करुणा पटवर्धन, सावंतवाडीचे गायक स्वप्नील गोरे आणि रत्नागिरीची गायिका वैष्णवी जोशी हे गायक कलाकार सहभागी होत आहेत. पं. हरिप्रसाद चौरासिया यांचे शिष्य असलेले प्रसन्नजीत जोशी यांचे बासरीवादनही या बैठकीत सादर होणार आहे.

या गायक मंडळींना साथसंगतही रत्नागिरीतीलच कलाकार करणार आहेत. त्यामध्ये चैतन्य पटवर्धन ,वरद सोहनी ,मंगेश मोरे(सर्व संवादिनी) केदार लिंगायत, हेरंब जोगळेकर, श्रीरंग जोगळेकर, प्रथमेश शहाणे (सर्व तबलासाथ) या साथीदारांसह ही बैठक रंगणार आहे.

कार्यक्रमाची सांगता पं.विश्वनाथ कान्हेरे यांचे हार्मोनियम एकल वादन आणि ज्येष्ठ गायक श्री. राजाभाऊ शेंबेकर यांच्या अभंगवाणीने होणार आहेत. कार्यक्रमासाठी प्रवेश विनामुल्य असून आर्ट सर्कल सभासदांनी तसेच रत्नागिरीतील संगीतप्रेमींनी स्वरभास्कर बैठकीला आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.