BREAKING NEWS: कोकणातील रत्नागिरी-सिंधुदुर्गातही दुष्काळ जाहीर; ११ तालुक्यांचा समावेश

 

रत्नागिरी, संगमेश्वर, राजापूरसह सिंधुदुर्गातील सर्व ८ तालुक्यांमध्ये Trigger-1
जमीन महसूल, पीक कर्ज, वीजबिलासह विविध सवलती लागू

रत्नागिरी : राज्य शासनाने राज्यात जाहीर केलेल्या दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तालुक्यांचाही समावेश राज्य शासनाने केला आहे.

खरीप हंगाम २०२६ मध्ये पर्जन्यमानातील तूट आणि अन्य घटकांमुळे राज्यातील तब्बल २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाने २५ सप्टेंबर २०२६ रोजी शासन निर्णय काढून या २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. यामध्ये कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील तीन आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व आठ तालुक्यांचा समावेश आहे. 

रत्नागिरी जिल्ह्यात रत्नागिरी, संगमेश्वर आणि राजापूर या तीन तालुक्यांमध्ये खरीप हंगामातील Trigger-1 (प्रथम कळ) लागू झाली आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी, दोडामार्ग, कणकवली, कुडाळ, वैभववाडी, मालवण, देवगड आणि वेंगुर्ला या सर्व आठ तालुक्यांचा दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. शासन निर्णयाच्या परिशिष्ट-१ मध्ये रत्नागिरीसाठी तीन आणि सिंधुदुर्गसाठी आठ तालुके स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहेत. 

पावसातील तूट आणि खरीप परिस्थितीचा परिणाम

राज्यातील खरीप हंगामातील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर कृषी आयुक्तांनी २४ सप्टेंबर २०२६ रोजी सादर केलेल्या अहवालाच्या आधारे राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले. जून महिन्यापासून आतापर्यंतच्या कालावधीतील पर्जन्याची तूट तसेच अन्य घटकांचा विचार करून संबंधित तालुक्यांमध्ये Trigger-1 लागू करण्यात आला आहे. 

Trigger-1 लागू झालेल्या तालुक्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी पंचनाम्याची कार्यवाही तातडीने सुरू करावी, तसेच सर्वेक्षण करण्यात आलेल्या क्षेत्रातील पिकांची सद्यस्थिती दर्शविणारे छायाचित्र आणि GPS कोऑर्डिनेट संकलित करून पीक परिस्थितीचा अहवाल कृषी आयुक्तांमार्फत शासनाकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 

रत्नागिरीतील तीन तालुक्यांना दिलासा

रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी, संगमेश्वर आणि राजापूर या तीन तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती जाहीर झाल्याने या भागातील शेतकऱ्यांना शासनाच्या विविध सवलतींचा लाभ मिळणार आहे. विशेषतः खरीप पिकांवर परिणाम झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे आणि पीक परिस्थितीचे सर्वेक्षण याकडे आता प्रशासनाचे लक्ष राहणार आहे. 

सिंधुदुर्गातील सर्व आठ तालुके दुष्काळग्रस्त यादीत

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दृष्टीने हा शासन निर्णय विशेष महत्त्वाचा ठरला आहे. जिल्ह्यातील सावंतवाडी, दोडामार्ग, कणकवली, कुडाळ, वैभववाडी, मालवण, देवगड आणि वेंगुर्ला या आठही तालुक्यांमध्ये Trigger-1 लागू झाला आहे. म्हणजेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकही तालुका या यादीबाहेर राहिलेला नाही. 

दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आलेल्या २६५ तालुक्यांमध्ये शासनाने विविध उपाययोजना आणि सवलती लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये—

  • जमीन महसुलात सूट
  • पीक कर्जाचे पुनर्गठन
  • शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती
  • कृषी पंपांच्या चालू वीजबिलात सूट
  • शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी
  • रोजगार हमी योजनेअंतर्गत कामांच्या निकषांमध्ये शिथिलता आणून जास्तीत जास्त कामे सुरू करणे
  • गरजेनुसार टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा
  • टंचाई जाहीर केलेल्या गावांमध्ये शेतकऱ्यांच्या कृषी पंपांची वीज जोडणी खंडित न करणे
  • शेतीवर अवलंबून असलेल्या शेतकरी व मजुरांना अन्नधान्याची टंचाई भासू नये यासाठी व्यवस्था
  • जनावरांसाठी आवश्यक चारा उपलब्ध करून देणे
  • जलसंधारणाची कामे सुरू करणे
  • पिण्याचे पाणी तसेच जनावरांच्या पाण्याचे नियोजन करणे

या उपाययोजनांचा समावेश आहे. 

पीक नुकसानभरपाई स्वतंत्र निर्णयाने

दरम्यान, दुष्काळग्रस्त २६५ तालुक्यांतील शेतकऱ्यांना पीक नुकसानीबाबतची मदत स्वतंत्र शासन निर्णयाद्वारे जाहीर केली जाणार आहे. त्यासाठी विहित कार्यपद्धती पूर्ण करण्याची प्रक्रिया आवश्यक असल्याचे शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे आता पंचनामे आणि पीक परिस्थितीच्या सर्वेक्षणाकडे लक्ष लागले आहे. 

राज्यात २६५ तालुक्यांमध्ये Trigger-1

शासनाच्या परिशिष्टानुसार राज्यातील एकूण २६५ तालुक्यांमध्ये Trigger-1 लागू झाला आहे. त्यात कोकण विभागातील रत्नागिरीचे तीन आणि सिंधुदुर्गचे आठ तालुके, तर रायगडमधील श्रीवर्धन तालुक्याचा समावेश आहे. राज्यातील इतर विभागांमध्येही मोठ्या संख्येने तालुक्यांना दुष्काळी परिस्थितीचा फटका बसला आहे.