मसुरे परिसरात १२ दिवसांच्या गणरायाला भावपूर्ण निरोप!

मसुरे | झुंजार पेडणेकर :मसुरे गाव आणि लगतच्या संपूर्ण परिसरात गेली १२ दिवस मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात पूजल्या गेलेल्या गणरायाला अनंत चतुर्थीच्या दिवशी अत्यंत भावूक वातावरणात निरोप देण्यात आला. “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!” या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.

बारा दिवसांच्या भक्तिमय पाहुणचारानंतर भाविकांनी आपल्या लाडक्या बाप्पाला जड अंतःकरणाने निरोप दिला. विसर्जन मिरवणुकांदरम्यान पारंपरिक ढोल-ताशांचा गजर, गुलाल आणि भाविकांच्या उत्साहाला उधाण आले होते. सायंकाळच्या सुमारास परिसरातील प्रमुख नदी किनारे आणि खाडी किनाऱ्यांवर गणपती बाप्पाच्या मूर्तींचे पारंपरिक रीतीरिवाजांनुसार विसर्जन करण्यात आले.

विसर्जन स्थळांवर कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी योग्य ती काळजी घेण्यात आली होती. मसुरे पोलीस संजय हुंबे, तुषार वाघाटे आणि होमगार्ड कर्मचारी वाहतूक व्यवस्था सुरळीत रहावी म्हणून कार्यरत होते. विसर्जनाच्या वेळी अबालवृद्धांसह महिला व तरुणांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली.