डिजिटल अरेस्टची भीती दाखवून गिर्ये येथील शिक्षकेची फसवणूक

देवगड / प्रतिनिधी
‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून गिर्ये परिसरातील एका शिक्षिकेची २५ हजाराची ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी विजयदुर्ग पोलीस स्थानकात दाखल फिर्यादीनुसार अज्ञात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २४ सप्टेंबर रोजी सकाळी १०.४५ वाजता ते दुपारी १२.१५ वाजण्याच्या कालावधीत घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर पीडित महिलेच्या मोबाईलवर २४ सप्टेंबर रोजी सकाळी १०.४५ वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने फोन करून तुम्ही तुमच्या मोबाईलवरून भारत सरकारने बॅन केलेले पॉर्न वेबसाईट ओपन केल्या असून तुम्हाला मुंबई सायबर क्राईम ब्रेन्चकडून अटक वॉरंट बजाविण्यात आल्याचे सांगण्यात आले. यावर पीडित महिलेने आपण असे काहीही केलेले नसल्याचे सांगताच संशयिताने तुम्ही असे केले नाही, मग तुमच्या नावे अटक वॉरट कसे निघाले आहे? असा प्रश्न पीडितेला विचारला. तसेच संशयिताने पीडितेला ‘तुमची सर्व माहिती आमच्याकडे असून तुम्हाला येथील पोलीस ठाण्यात यावे लागणार. तसेच तुम्हाला एक लाख रूपये दंड भरावा लागणार व एक वर्षाचा कारावास होणार’, असे सांगितले. त्यानंतर संशयिताने पीडितेच्या व्हॉटस्अप नंबरवर अश्लिल फोटोसह मेसेज पाठविला. सदरचे अश्लिल फोटो पाहून पीडितेच्या मनात लज्जा उत्पन्न झाली. पीडितेने त्या व्हॉटस्अप नंबरच्या खाली ‘पुरन सिंग सायबर’ असे नाव दिसले. त्यानंतर संशयिताने व्हिडिओ कॉल करून पीडितेला तिच्या बदनामीची धमकी देऊन, ‘पोलीस तुमच्या घरी पाठविले असते. मी माझ्या वरिष्ठांशी बोलून तुमचा माफीनामा पाठवतो’, असे सांगून व्हिडिओ कॉल कट केला. व्हिडिओ कॉलवरील संशयित व्यक्ती ही पोलीस गणवेशामध्ये होती. त्यानंतर संशयिताने पीडितेला पुन्हा वेगळ्या नंबरवरून कॉल करून ‘तुम्ही एक लाखाचा २५ टक्के दंड भरा. तरच तुमचा माफीनामा तयार करून तुमचे वॉरंट रद्द करतो’, असे सांगितले. पीडितेने घाबरून संशयिताने पाठविलेल्या स्कॅनरवर प्रथम १२ हजार ५०० रूपये व पुन्हा थोड्या वेळाने संशयिताच्या सांगण्यावरून १२ हजार ५०० रूपये असे एकूण २५ हजार रूपये संशयिताने दिलेल्या अकाऊंटवर पीडितेने पाठविले. मात्र, थोड्या वेळानंतर संशयिताने पीडितेला पुन्हा फोन करून तुमच्या माफीनाम्यावर दोन स्टॅम्प लावावे लागतील. प्रत्येकी स्टॅम्प हा ३५ हजार रूपयांचा असून दोन्हीसाठी ७० हजार रूपये द्यावे लागतील’, असे सांगितले. यावेळी आपली ऑनलाईन आर्थिक फसवणूक होत असल्याचे पीडितेच्या लक्षात येताच पीडितेने संशयिताचा फोन कट केला व पोलिसांच्या १८००१२३४ या टोल फ्री नंबरवर कॉल करून पीडितेने सायबर फसवणुकीबाबत तक्रार नोंदविली. तसेच त्यांनी आपले बँक खातेही फ्रीज केले. त्यानंतर पीडितेने विजयदुर्ग पोलीस स्थानकात आपली ऑनलाईक आर्थिक फसवणूक झाल्याची फिर्याद दाखल केली. या फिर्यादीनुसार विजयदुर्ग पोलिसांनी अज्ञात संशयिताविरुद्ध माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६ (क), ६६ (ड), ६७ (अ), भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१८ (४), ३१९, ७९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास विजयदुर्गचे पोलीस निरीक्षक दत्ता भोसले व पोलीस हवालदार प्रशांत जाधव करीत आहेत.

दरम्यान, पोलीस अधिकारी, सीबीआय, सायबर क्राईम किंवा बँक अधिकारी असल्याचे सांगून फोन अथवा व्हिडिओ कॉल करणाऱ्या अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नये. गुन्हयात अडकवण्याची किंवा अटक करण्याची भीती दाखवून पैसे मागितल्यास कोणतीही रक्कम पाठवू नये. तसेच ओटीपी, युपीआय, पीन, बँक खात्याची माहिती किंवा वैयक्तिक कागदपत्रांची माहिती अनोळखी व्यक्तींना देऊ नये. सायबर फसवणूक झाल्यास तात्काळ १९३० या हेल्पलाईनवर संपर्क साधावा आणि नजीकच्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी, असे आवाहन विजयदुर्ग पोलिसांच्यावतीने करण्यात आले आहे.