विद्यार्थ्यांच्या कलाकृतीचे सर्वत्र कौतुक
चिपळूण (वार्ताहर) : तालुक्यातील निर्व्हाल गावातील मधलीवाडी येथे सालाबादप्रमाणे यंदाही विद्यार्थी व पालकांच्या सहकार्याने हुबेहूब किल्ले राजगड साकारण्यात आला आहे. दिवाळीच्या सुट्टीत साकारलेल्या या भव्य किल्ल्याने संपूर्ण परिसराचे लक्ष वेधून घेतले असून तो पाहण्यासाठी आजूबाजूच्या गावातून मोठ्या संख्येने नागरिक, विद्यार्थी व शिवप्रेमी येत आहेत.
हा किल्ला तयार करण्यासाठी विराज मयेकर, गंधर्व जाधव, अमेय तावडे, सुजल सावंत, सर्वेश सावंत, विनोद सावंत, राजेश मयेकर, अमर कीर यांचे मोलाचे योगदान लाभले आहे. या सर्व तरुणांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून, माती, दगड, शेण, गवत, कागद, पुठ्ठा अशा नैसर्गिक साहित्याचा वापर करून राजगडाचा हुबेहूब नमुना उभा केला आहे. किल्ल्यावर पद्मावती माची, सुवेळा माची, संजीवनी माची, बालेकिल्ला, पद्मावती तलाव, राजवाडा, बुरूज, तटबंदी, दरवाजे, भगवा ध्वज अशा सर्व बारकाव्यांसह राजगडाची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. सध्याच्या काळात विद्यार्थी मोबाईल, व्हिडीओ गेममध्ये अडकलेले असताना मधलीवाडीतील विद्यार्थ्यांनी मोबाईल बाजूला ठेवून हाताने किल्ला बनवून छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची आठवण करून दिली आहे. किल्ला बनवताना त्यांनी राजगडाचा इतिहास, शिवरायांची राजधानी, स्वराज्याची स्थापना याबद्दल माहितीही जाणून घेतली. त्यामुळे केवळ कलाकृतीच नाही, तर इतिहासाचे धडेही त्यांना मिळाले. पालकांनीही या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेत मुलांना लागणारे साहित्य, जागा व प्रोत्साहन दिले. त्यामुळे पालक व विद्यार्थी यांच्यातील नाते अधिक घट्ट झाले असून, एकत्र काम करण्याचा आनंद त्यांनी अनुभवला. हा किल्ला पाहण्यासाठी निर्व्हाळसह, चिपळूण तालुक्यातील इतर गावांमधून लोक येत आहेत. हुबेहूब असलेल्या राजगड किल्ल्याचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक केले जात आहे. ग्रामस्थ, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते यांनी या तरुण व विद्यार्थ्यांच्या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले आहे.
या किल्ल्याच्या माध्यमातून एक महत्त्वाचा संदेश देण्यात येतो, तो म्हणजे शिवाजी महाराजांचे कार्य, त्यांचा पराक्रम, स्वराज्याची प्रेरणा नवीन पिढीला कळावी. किल्ले ही केवळ दगड-मातीची बांधकामे नाहीत, तर ती आपल्या अस्मितेची प्रतीके आहेत. त्यांचे जतन व संवर्धन करणे हे आपले कर्तव्य आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, संघभावना, श्रमप्रतिष्ठा व इतिहासाबद्दल आवड निर्माण झाली आहे. मधलीवाडीतील या किल्ल्याने पुन्हा एकदा दिवाळीतील किल्ला बनवण्याची परंपरा जिवंत ठेवली असून, इतर गावांसाठीही तो आदर्श ठरला आहे.













