ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार अन् भात पीक पंचनाम्यांसाठी मदत!

▪️ग्रामपंचायत आडवली-मालडीचा सेवा सप्ताहात स्तुत्य उपक्रम

मसुरे | झुंजार पेडणेकर 

सेवा सप्ताहाच्या औचित्याने ग्रामपंचायत आडवली-मालडी च्या वतीने विविध सामाजिक व शेतकरी उपयोगी उपक्रम राबवून सेवा सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला.

‘जागतिक ज्येष्ठ नागरिक दिना’चे औचित्य साधून ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील वयोवृद्ध व ज्येष्ठ नागरिकांचा कापडी पिशव्या देऊन विशेष सत्कार करण्यात आला. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्लास्टिकमुक्त गावाचा संदेश देत, ज्येष्ठांचा मान-सन्मान राखण्याच्या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला होता.

याचबरोबर, सध्याच्या दुष्काळजन्य परिस्थितीमुळे अडचणीत सापडलेल्या बळीराजाला दिलासा देण्यासाठी भात पीक पंचनाम्यांचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या पंचनामा प्रक्रियेत शेतकऱ्यांना कोणत्याही अडचणी येऊ नयेत, यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात आले.

या प्रसंगी ग्रामपंचायत अधिकारी युवराज चव्हाण यांच्यासह ग्रामपंचायतीचे सर्व कर्मचारी वर्ग आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामपंचायतीच्या या तत्पर व सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या उपक्रमांचे ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.