दिवेआगर दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर नगरसेविका अंजली कदम यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
चिपळूण (प्रतिनिधी) : रायगड जिल्ह्यातील दिवेआगर समुद्रकिनारी सहलीसाठी गेलेल्या पुण्यातील आठ विद्यार्थ्यांचा समुद्रात बुडून झालेला दुर्दैवी मृत्यू संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणारा आहे. या पार्श्वभूमीवर चिपळूण नगरपरिषदेच्या नगरसेविका तथा नगर बाल संरक्षण समितीच्या अध्यक्षा अंजली कदम यांनी रत्नागिरी जिल्ह्यात समुद्रकिनारी जाणाऱ्या अल्पवयीन मुलांच्या सुरक्षिततेसाठी कठोर व प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
दिवेआगर येथे १ ऑक्टोबर रोजी घडलेल्या दुर्घटनेत अकरावी-बारावीतील आठ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. हे विद्यार्थी आळंदी येथील एका खासगी कोचिंग संस्थेच्या सहलीसाठी आले होते. ४८ जणांच्या समूहातील विद्यार्थ्यांनी समुद्रात प्रवेश केल्यानंतर पाण्याची खोली व समुद्राच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने ही दुर्घटना घडल्याचे प्राथमिक माहितीत समोर आले आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर अंजली कदम यांनी रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात ‘पर्यटन वाढले, पण सुरक्षित पर्यटनाची जबाबदारीही वाढली’ याकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. कोकणातील समुद्रकिनारे पर्यटकांसाठी मोठे आकर्षण ठरत असले तरी बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना स्थानिक समुद्राची खोली, भरती-ओहोटी, प्रवाह, खड्डे तसेच समुद्राच्या बदलत्या स्थितीची पुरेशी माहिती नसते. त्यामुळे अनेकदा धोकादायक ठिकाणी पर्यटक पोहोचतात. अल्पवयीन मुलांसाठी जीवरक्षकांची सक्ती करा रत्नागिरी जिल्ह्यात अशा दुर्घटना भविष्यात टाळण्यासाठी १८ वर्षांखालील मुलांना जीवरक्षकांच्या देखरेखीशिवाय समुद्रात जाण्यास प्रतिबंध करावा, अशी ठोस मागणी कदम यांनी केली आहे.
लहान मुले अथवा विद्यार्थी समुद्रकिनारी येत असतील तर त्यांच्यासोबत प्रशिक्षित जीवरक्षक असणे बंधनकारक करावे, अशी सूचना त्यांनी केली आहे. तसेच मुलांसोबत आलेले पालक, शिक्षक किंवा जबाबदार व्यक्ती यांनी मुलांवर सातत्याने देखरेख ठेवावी. समुद्रकिनारी जाण्यापूर्वी संबंधितांकडून विहित नमुन्यातील सुरक्षा हमीपत्र किंवा जबाबदारीचा अर्ज भरून घेण्याची व्यवस्था करावी. आवश्यक सुरक्षाव्यवस्था पूर्ण झाल्याशिवाय अल्पवयीन मुलांना समुद्रात जाण्याची परवानगी देऊ नये, अशी मागणी त्यांनी केली आहे.
समुद्रकिनाऱ्यांवर धोकादायक ठिकाणी स्पष्ट सूचना फलक, खोल पाण्याच्या मर्यादा दर्शविणाऱ्या खुणा, भरती-ओहोटीची माहिती, आपत्कालीन संपर्क क्रमांक आणि प्रशिक्षित जीवरक्षकांची नियुक्ती करण्याची गरजही कदम यांनी अधोरेखित केली आहे. कोकणातील पर्यटनाचा विस्तार होत असताना पर्यटकांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. ‘सुरक्षित पर्यटन’ ही केवळ प्रशासनाची नव्हे तर पर्यटक, पालक, शिक्षक आणि पर्यटन व्यावसायिकांचीही सामूहिक जबाबदारी आहे. मात्र अल्पवयीन मुलांच्या बाबतीत प्रशासनाने अधिक कठोर प्रतिबंधात्मक व्यवस्था उभारणे आवश्यक असल्याचे कदम यांनी म्हटले आहे. दिवेआगरसारखी हृदयद्रावक घटना पुन्हा घडू नये आणि रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्रकिनारे पर्यटकांसाठी सुरक्षित राहावेत, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून तातडीने योग्य कार्यवाही करावी, अशी अपेक्षा अंजली कदम यांनी व्यक्त केली आहे.












