स्वच्छता दूतांच्या कार्याचा इनरव्हील क्लब ऑफ कुडाळकडून गौरव

दिवाळीनिमित्त ३५ स्वच्छता कर्मचाऱ्यांना चादरींचे वाटप; वेद आणि मराठा क्लॉथ स्टोअर्सचे सौजन्य

स्वप्निल कदम -कुडाळ : 

शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या स्वच्छता दूतांच्या कार्याचा गौरव इनरव्हील क्लब ऑफ कुडाळच्या वतीने करण्यात आला. दिवाळी सणाचे औचित्य साधून वेद आणि मराठा क्लॉथ स्टोअर्स यांच्या सौजन्याने कुडाळ नगरपंचायतीमध्ये कार्यरत असलेल्या ३५ स्वच्छता दूतांना चादरी भेट देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

 

इनरव्हील क्लब ऑफ कुडाळच्या अध्यक्षा सौ. प्राप्ती तेली यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. कुडाळ शहर स्वच्छ ठेवण्यात स्वच्छता दूतांचे योगदान अत्यंत मोलाचे असून, त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना सन्मानित करणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे. या भावनेतून दरवर्षी अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असल्याचे सौ. प्राप्ती तेली यांनी सांगितले.

 

या उपक्रमातून ३५ स्वच्छता कर्मचाऱ्यांना चादरींचे वाटप करून त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. या छोट्याशा भेटवस्तूमुळे स्वच्छता दूतांच्या दिवाळीचा आनंद द्विगुणित झाला.

 

यावेळी इनरव्हील क्लब ऑफ कुडाळच्या अध्यक्षा सौ. प्राप्ती तेली, सचिव प्राची तेर्से, डॉ. सायली प्रभू, ऋतुजा परब, वैशाली कुडाळकर, आरोही माने, रोटरी क्लब ऑफ कुडाळचे माजी अध्यक्ष अभिजित परब, रवींद्र परब, बंड्या सावंत, आदिती सावंत, नगरपंचायतीचे कर्मचारी आदी उपस्थित होते.