आंबडोसमध्ये श्रमदानातून उभारला ‘वनराई बंधारा’

▪️दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थ व कृषी विभागाचा स्तुत्य उपक्रम!

मसुरे | झुंजार पेडणेकर

वाढत्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आणि पाणीटंचाईचे संकट लक्षात घेता, आंबडोस पावनवाडी येथे जलसंधारणाचा एक आदर्श उपक्रम राबवण्यात आला आहे. ‘समर्थ कृपा शेतकरी गट’ आणि ‘आंबडोस पावनवाडी’ येथील ग्रामस्थांनी एकत्र येत श्रमदानाच्या माध्यमातून यशस्वीरीत्या ‘वनराई बंधारा’ बांधला आहे.

सध्याच्या काळात कृषी विभागाचे अधिकारी दुष्काळी परिस्थिती आणि पिकांचे पंचनामे करण्याच्या कामात व्यस्त आहेत. मात्र, केवळ पंचनाम्यांवर न थांबता गावोगावी भविष्यातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी कृषी अधिकारी स्वतः पुढाकार घेत आहेत. या उपक्रमाला स्थानिक सरपंच आणि ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे.

बंधारा बांधणीच्या वेळी मालवण तालुका कृषी अधिकारी श्री. अमोल करंदीकर, आंबडोसच्या सरपंच सौ. सुबोधिनी परब, धामापूरचे उप कृषी अधिकारी श्री. एस. जी. परब, मालवणचे उप कृषी अधिकारी श्री. डी. डी. गावडे, ग्रामपंचायत अधिकारी श्री. गणेश नलावडे तसेच कृषी सेवक श्रीम. स्नेहा खोत आणि पावनवाडीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्रमदानातून उभारण्यात आलेल्या या वनराई बंधाऱ्यामुळे परिसरातील भूजल पातळी वाढण्यास मदत होणार असून, येणाऱ्या कडक उन्हाळ्यात विहिरी व कूपनलिकांची पाण्याची पातळी टिकून राहण्यास मोठी मदत होणार आहे. ग्रामस्थ आणि कृषी विभागाच्या या संयुक्त प्रयत्नांचे संपूर्ण तालुक्यातून कौतुक केले जात आहे.