महालक्ष्मी ग्रुप भांबेड द्वितीय; नवयुग उत्कर्ष युवक मंडळाचे आयोजन
लांजा (प्रतिनिधी) : तालुक्यातील भांबेड पेठदेव येथील नवयुग उत्कर्ष युवक मंडळाच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय मंगळागौर स्पर्धेत वरदान देवी मंगळागौर, कडवई, (ता. संगमेश्वर) या संघाने प्रथम क्रमांक पटकावला.
नवयुग उत्कर्ष युवक मंडळाच्या वतीने तिसऱ्या वर्षी आयोजित केलेल्या या मंगळागौर स्पर्धेत उत्साह, पारंपरिक कला आणि सांस्कृतिक रंगांची अनोखी मेजवानी पाहायला मिळाली. जिल्ह्यातील विविध संघांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत मंगळागौरीच्या पारंपरिक खेळांचे व लोककलेचे सुंदर सादरीकरण केले.
या स्पर्धेत कडवई संघाने आपल्या उत्कृष्ट सादरीकरणाने प्रथम क्रमांक पटकावला. विजेत्या संघाला चषक, प्रमाणपत्र व रोख ५,००० देऊन गौरविण्यात आले.द्वितीय क्रमांक महालक्ष्मी ग्रुप, भांबेड, ता. लांजा यांनी मिळवला. त्यांना चषक, प्रमाणपत्र व रोख ४,००० देण्यात आले. तृतीय क्रमांक स्वामी समर्थ ग्रुप, लांजा यांनी मिळवला असून त्यांना चषक, प्रमाणपत्र व रोख ३,००० देण्यात आले. उत्तेजनार्थ पारितोषिक विद्यादान ग्रुप, भांबेड हायस्कूल यांना मिळाले. या संघाला चषक, प्रमाणपत्र व रोख १,००० देऊन सन्मानित करण्यात आले.
स्पर्धेतील उल्लेखनीय योगदानाबद्दल ‘बेस्ट सखी’ म्हणून डॉ. अश्विनी अभिराज नारकर यांचा विशेष गौरव करण्यात आला.
स्पर्धेचे परीक्षण निधी लिंगायत व मंदार जाधव यांनी केले. पारंपरिक मंगळागौरीचे खेळ, उत्स्फूर्त नृत्य, आकर्षक सादरीकरण, सांघिक समन्वय आणि मराठी संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या विविध कलाविष्कारांमुळे स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
मंगळागौर या पारंपरिक लोककलेचे जतन व संवर्धन व्हावे, तसेच महिलांना आपल्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने नवयुग उत्कर्ष युवक मंडळाकडून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी नवयुग उत्कर्ष युवक मंडळ, भांबेड (पेठदेव) येथील सर्व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.












