लांजा (प्रतिनिधी) : कृषी विद्यालय लांजा च्या सन १९८४-८६ च्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन २ आणि ३ ऑक्टोबर रोजी ग्रीन नेस्ट गार्डन रिसॉर्ट लांजा येथे उत्साहात संपन्न झाले. तब्बल ४० वर्षानंतर हे सर्व मित्र एकत्र आल्यानंतर जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला.
स्नेहसंमेलनाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला दीपप्रज्वलन व पुष्पहार घालून झाली.उपस्थित सर्व माजी विद्यार्थ्यांचे स्वागत त्यानंतर बॅचमधील दिवंगत मित्रांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. सर्व माजी विद्यार्थी तब्बल ४० वर्षानंतर एकत्र आल्यामुळे प्रत्येकाचा आनंद ओसंडून वाहत होता. यावेळी प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या कुटुंबाची आणि सद्यस्थितीबाबत माहिती दिली. सर्व विद्यार्थी यांनी एकमेकांशी संवाद साधून मनमोकळेपणाने हितगुज केले. दुपारच्या सत्रात कॅरम, बुद्धिबळ या खेळाचा आनंद लुटून एकमेकांशी संवाद साधला. सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून काही माजी विद्यार्थी यांनी आपल्या विविध कला सादर केल्या. त्यामध्ये श्री आनंद कुंभार यांनी सादर केलेल्या दशावतारातील राजा या सादरीकरणाला सर्व माझी विद्यार्थी यांनी उत्स्फूर्त दाद दिली.
दिनांक ३ ऑक्टोबर रोजी प्रत्यक्ष कृषी विद्यालय लांजा येथे भेट देऊन सर्व विद्यार्थी जुन्या आठवणीत रमून गेले. स्नेहसंमेलनामुळे जुन्या आठवणींना पुन्हा उजाळा मिळाला. स्नेहसंमेलन यशस्वी करण्यासाठी लांजा तालुक्यातील सर्व माजी विद्यार्थी यांनी मेहनत घेतली.














