देवगड- प्रतिनिधी
दारुच्या नशेत पोलीस ठाण्यात धिंगाणा घालून पोलीस ठाण्याबाहेरील लाईटचा लॅम्प हाताने फोडून नुकसान केल्याप – करणी सागर भिकाजी शिंगाडे (२८, रा. तळेबाजार वरेरी) या संशयिताविरुद्ध देवगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारच्या सुमारास सागर शिंगाडे या संशयिताने देवगड पोलीस ठाण्यात येत मोठमोठ्याने आरडाओरड करून उपस्थित असलेल्या नागरिकांना शिवीगाळ केली. तसेच पोलीस ठाण्याच्या बाहेरील लाईटचा लॅम्प त्याने हाताने फोडून नुकसान झाले. याबाबत महिला पोलीस हवालदार सविता शैलेश लाड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित सागर शिंगाडे याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम १९४९ चे कलम ८५ (१), भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३२४ (३), ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रवीण सावंत करत आहेत.













