मोरजीत १८ ऑक्टोबरला ‘भक्तिगीत सागर’ पुस्तकाचे प्रकाशन

पत्रकार निवृत्ती शिरोडकर यांचा भक्तिगीतांचा संग्रह

 

पेडणे (प्रतिनिधी) :

 

मोरजी येथील पत्रकार तथा साहित्यिक निवृत्ती शिरोडकर लिखित ‘भक्तिगीत सागर’ पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रविवार १८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता बागवाडा-मोरजी येथील श्री दत्तात्रय देवस्थान सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. श्रद्धा, भक्ती आणि साहित्य यांचा सुंदर संगम असलेल्या या पुस्तकात विविध देव-देवतांवरील भक्तिगीतांचा समावेश करण्यात आला आहे.

 

या प्रकाशन सोहळ्याला मांद्रे मतदारसंघाचे आमदार जीत आरोलकर, प्रा. विनय मडगावकर, मोरजी सरपंच विलास मोर्जे, साहित्यिक तथा पत्रकार निवृत्ती शिरोडकर, मांद्रे सरपंच किरण सावंत, माजी जिल्हा पंचायत सदस्य रंगनाथ कलशावकर, मोरजी माजी सरपंच सतीश शेटगावकर, मोरजी सार्वजनिक श्रीदुर्गा उत्सव समितीचे अध्यक्ष सागर पोंबुर्फेकर, संस्थापक अध्यक्ष सुधीर कान्नाइक, सचिव स्नेहा तिळोजी, श्री दत्तात्रय देवस्थानचे अध्यक्ष योगेश बागकर, सचिव सतीश चारी आणि खजिनदार यतीन केरकर यांच्यासह समितीचे पदाधिकारी, साहित्यप्रेमी, भक्तगण व नागरिक उपस्थित राहणार आहेत.

 

पत्रकारितेबरोबरच साहित्य आणि गीतलेखन क्षेत्रात सातत्याने कार्यरत असलेल्या निवृत्ती शिरोडकर यांनी आपल्या लेखणीतून विविध विषयांना स्पर्श केला आहे. ‘भक्तिगीत सागर’च्या माध्यमातून त्यांनी देव-देवतांविषयीची श्रद्धा आणि भक्तिभाव गीतरूपाने शब्दबद्ध केला आहे. त्यामुळे हा प्रकाशन सोहळा साहित्यप्रेमींसह भक्तिगीत प्रेमींसाठीही विशेष आकर्षण ठरणार आहे.

 

गोव्याच्या ग्रामीण पत्रकारिता आणि साहित्य विश्वात गेली अनेक वर्षे सातत्याने कार्यरत असलेले निवृत्ती शिरोडकर हे संवेदनशील पत्रकार, साहित्यिक, कवी, गीतकार आणि कलावंतांच्या जीवनकार्याचे अभ्यासक म्हणून परिचित आहेत. मोरजी–पेडणे येथील सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, धार्मिक आणि लोककलेशी निगडित विषयांना त्यांनी आपल्या लेखणीद्वारे सातत्याने प्रसिद्धी दिली आहे. ग्रामीण जनजीवनातील प्रश्न, सर्वसामान्यांची सुख-दुःखे आणि उपेक्षित कलाकारांचे कर्तृत्व समाजासमोर आणणे हा त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू राहिला आहे.

 

पत्रकारितेबरोबरच साहित्यनिर्मितीच्या क्षेत्रातही त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले आहे. त्यांची वैभवशाली पेडणे महाल, अमृतवर्षिणी आई, जगात जनांची आई, जीवन वाट, अमृतांजली आई, मोरजीतील भूषणे, मंथन, रंगशारदा, रंगसम्राज्ञी, नाट्यश्री पेडणे आणि रंगमोहिनी ही पुस्तके प्रकाशित झाली आहेत. तसेच रंगदेवता, रंगश्री, रंगयात्रा, देवाघरची माउली आणि मनातील गीतगंगा ही पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर आहेत.

 

त्यांच्या पत्रकारिता आणि साहित्य सेवेची विविध स्तरांवर दखल घेण्यात आली आहे. त्यांना २०१७–१८ सालचा ‘गुज’ उत्कृष्ट ग्रामीण पत्रकार पुरस्कार तसेच दैनिक ‘लोकमत’चा ‘गोल्ड स्टार रिपोर्टर’ पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यांच्या ‘चेतना’ या पुस्तकाला अहमदनगर येथील कवी आनंद फंदी पुरस्कार, तर ‘जीवनवाट’ या कवितासंग्रहाला इंडियन टेलिफिल्म प्रॉडक्शनचा पुस्तक पुरस्कार–२०१२ प्राप्त झाला आहे. या प्रकाशन सोहळ्यास साहित्यप्रेमी, भाविक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.