मंडणगड l प्रतिनिधी :मुंबई विद्यापीठ संचलित, विश्वभूषण भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचा ११ वा वर्धापन दिन २३ ऑगस्ट २०२३ रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी आयोजित कार्यक्रमास प्रा. डॉ. दीपक रावेरकर (प्राचार्य सुंदरराव मोरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय पोलादपूर) हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना सहा. प्रा. अरुण ढंग यांनी महाविद्यालयाची पार्श्वभूमी आणि मागील दहा वर्षातील कामगिरीचे सिंहावलोकन केले. या कार्यक्रमास उपस्थित प्रमुख अतिथींचा परिचय सहा. प्रा. रकमन्ना मेटकरी यांनी केले. तदनंतर सहा. प्रा. अरुण ढंग यांनी सूत्रसंचालन करत उपस्थित मान्यवरांचा सहा. प्रा. मंगेश ठसाळे यांच्या हस्ते शाल व पुस्तक देवून यथोचित सम्मान करून स्वागत केले.
यावेळी मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. दीपक रावेरकर म्हणाले की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव आंबडवे ही स्फुर्तीभूमी अतिशय निसर्गरम्य ठिकाणी वसली आहे. या गावात ‘युजीसी व महाराष्ट्र शासन पुरस्कृत आणि मुंबई विद्यापीठ संचालित विश्वभूषण भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय’ या नावाने सुरु झालेले महाविद्यालय ज्या परिसरात आहे तो भाग विद्यानगरी म्हणून प्रसिद्ध होत आहे. अशा या स्पुर्तीभूमीतील विद्यानगरीत शिकणारे विद्यार्थी हे खरेच भाग्यवान आहेत. उच्च शिक्षणाचा मानबिंदू म्हणून विकसीत होणाऱ्या या आदर्श महाविद्यालयास आज ११ वर्ष पूर्ण होत आहेत. या महाविद्यालयात शिकवले जाणारे कौशल्यावर आधारित पदवी अभ्यासक्रम आणि विद्यार्थी- शिक्षक गुणोत्तर लक्षात घेता, हे महाविद्यालय म्हणजे गुरुकुलाची परंपरा जोपासणारे आदर्श महाविद्यालय असून, गुरुकुलातील विद्यार्थ्याप्रमाणेच येथील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होईल अशी खात्री वाटते. अशा महाविद्यालयास बाबासाहेबांच्या कुटूंबीयांनी शिक्षणासाठी विनामोबदला १४ एकर जागा दिली हे एक आदर्श उदाहरण आहे. पुढे ते शिक्षण घेताना नेहमी बाबासाहेबांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून उच्च शिक्षित व्हावे असे सांगितले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपात सहा. प्रा.मंगेश ठसाळे म्हणाले की, मंडणगड परिसरातील अतिदुर्गम व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालयाने गेल्या दहा वर्षात भरीव कामगिरी केली आहे. महाविद्यालयातून आत्तापर्यंत साधारणपणे ३८१ विद्यार्थ्यांनी पदवी संपादन करून शासकीय नोकरीसोबतच बँकिंग, फायनान्स, इन्शुरन्स, रिटेल, आय टी, प्रायव्हेट आणि पब्लिक लिमिटेड कंपनी, उद्योजक, पतसंस्था अशा विविध क्षेत्रात वेगवेगळ्या पदावर कार्यरत आहेत. पुढे ते असे म्हणाले की, सध्या महाविद्यालयात २०३ विद्यार्थी शिकत असून नजीकच्या भविष्यात ही संख्या भविष्यात द्विगुणीत होईल अशी खात्री वाटते.
या कार्यक्रमामध्ये महाविद्यालयात कार्यरत सहा. प्रा. डॉ. दीपक जाधव यांनी शैक्षणिक क्षेत्रातील सर्वोच्च पदवी अर्थात पी.एच.डी. प्राप्त केल्याबद्दल त्याचप्रमाणे सहा. प्रा. रकमन्ना मेटकरी यांनी विधी क्षेत्रातील पदवी अर्थात एल. एल. बी. प्राप्त केल्याबद्दल महाविद्यालातर्फे कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्रा. डॉ. दीपक रावेरकर यांच्या हस्ते शाल व पुस्तक देवून यथोचित सम्मान करण्यात आला.
या कार्यक्रमात मारुती काप, ज्योती रावेरकर यांनी आपले मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या शेवटी सहा. प्रा. अमोल राजेशिर्के यांनी कार्यक्रमास उपस्थित सर्वांचे आभार मानले. सदर कार्यक्रमास पंचक्रोशीतील ग्रामस्थ, माजी विद्यार्थी, पालक, लोकप्रतिनिधी, शिक्षक, प्रशासकीय कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुंबई विद्यापीठ, रत्नागिरी उपपरिसर चे प्र. संचालक डॉ. किशोर सुखटनकर तसेच महाविद्यालयाचे समन्वयक डॉ. अंशुमन मगर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला.












