मोबाईल नेटवर्क समस्या व आंबा नोंदणीतील तांत्रिक शब्दामुळे शेतकरी चिंतेत
सावंतवाडी । प्रतिनिधी :
भात, आंबा व काजू पीक विमा योजनेअंतर्गत ई-पीक पाहणी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र ग्रामीण भागातील मोबाईल नेटवर्कची समस्या, डाऊन असणारे सर्व्हर आणि आंबा पीक नोंदणीदरम्यान प्रणालीत येणाऱ्या तांत्रिक शब्द बदलामुळे शेतकरी व बागायतदार साशंक आहेत.
यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर शासनाकडून खबरदारीचे उपाय योजले जात असून ई-पीक पाहणीवर भर दिला जात आहे. परंतु ग्रामीण भागात नेटवर्क उपलब्ध नसल्याने आणि वारंवार सर्व्हर डाऊन होत असल्याने ई-पीक नोंदणी करताना शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
आंबा पिकाच्या ई-नोंदणीदरम्यान ‘अल्फान्सो’ या प्रसिद्ध शब्दाऐवजी प्रणालीमध्ये ‘कोकणची रूची’ असा पर्याय दिसत असल्याचे बागायतदारांच्या निदर्शनास आले आहे. ‘कोकणची रूची’ या नावाने नोंदणी झाल्यास ‘अल्फान्सो’प्रमाणे मिळणारे विमा संरक्षण आणि रक्कम कमी मिळेल का, अशी भीती आंबा बागायतदारांनी व्यक्त केली आहे.
या संदर्भात बोलताना सावंतवाडी तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष प्रमोद गावडे म्हणाले, “गेल्या वर्षी नेटवर्क अभावी भात खरेदी प्रक्रियेत शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता. यंदा तशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी प्रशासनाने तातडीने नेटवर्कची सुविधा सुरळीत करावी किंवा पर्याय निर्माण करावा. तसेच आंबा नोंदणीत ‘अल्फान्सो’ऐवजी ‘कोकणची रूची’ असा शब्द येत असल्याची बाब कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे.”
दरम्यान, या समस्येबाबत सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, “आंबा ई-पीक नोंदणीमध्ये ‘अल्फान्सो’ऐवजी ‘कोकणची रूची’ असा पर्याय येत असल्याबाबत वरिष्ठ पातळीवरून खात्री करून घेतली जाईल. शेतकऱ्यांच्या शंकेचे निरसन करून योग्य ती कार्यवाही केली जाईल,” असे त्यांनी स्पष्ट केले.













