खासदार नारायण राणे यांची प्रमुख उपस्थिती;
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्हीसीद्वारे मार्गदर्शन
सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टीच्या वतीने देशभर सुरू असलेल्या ‘सेवा संकल्प अभियाना’ अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध सेवा उपक्रम राबविण्यात येत आहेत. या अभियानाचा एक भाग असलेले ‘सेवा ज्योती अभियान’ बुधवार, ७ ऑक्टोबर रोजी जिल्हाभरात उत्साहात राबविण्यात येणार असून, जिल्ह्यातील १४ मंडळांमध्ये ‘सेवा ज्योती’ पदयात्रा काढण्यात येणार आहे. त्यानंतर वेंगुर्ला येथे ‘विकसित भारत संकल्प सभा’ आयोजित करण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुख्यमंत्री ते पंतप्रधान अशा राष्ट्रसेवेच्या २५ वर्षपूर्तीनिमित्त बुधवार, ७ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता वेंगुर्ला येथील मधुसूदन कालेलकर सभागृहात ही सभा होणार आहे. या सभेला माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार नारायणराव राणे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या कार्यक्रमात केंद्र व राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचे लाभार्थी, पुरस्कारप्राप्त खेळाडू तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर आपले मनोगत व्यक्त करणार आहेत. त्यानंतर खासदार नारायण राणे उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थितांना संबोधित करणार आहेत.
सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांपर्यंत शासनाच्या कल्याणकारी योजना पोहोचविण्यासह सेवा, सहभाग आणि राष्ट्रनिर्मितीचा संदेश देण्यात येत आहे. ‘सेवा ज्योती’ पदयात्रेच्या माध्यमातून जिल्ह्यातील कार्यकर्ते व नागरिकांचा सहभाग वाढविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमास जिल्ह्यातील सर्व जिल्हा व मंडल पदाधिकारी, कार्यकर्ते, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, सरपंच तसेच सर्व लोकप्रतिनिधींनी वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत आणि जिल्हाध्यक्ष युवा मोर्चा तथा सेवा ज्योती यात्रा अभियानाचे संयोजक संदीप मेस्त्री यांनी केले आहे.












