लोरे नं. २ येथे कृषी सम्राट गटाकडून कोकण जलकुंड निर्मितीचे प्रात्यक्षिक !

जलकुंड येणाऱ्या दुष्काळासाठी व पाणी साठवणीसाठी पर्याय !

 

फोंडाघाट : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली यांच्या रावे कार्यक्रमांतर्गत कृषी सम्राट गटामार्फत लोरे नं. २, वैभववाडी येथे कोकण जलकुंड निर्मितीचे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले. कोकणातील उन्हाळी हंगामातील पाणीटंचाईवर मात करून पावसाचे पाणी साठवून त्याचा गरजेच्या वेळी शेतीसाठी वापर करता यावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

 

 

 

प्रात्यक्षिकामध्ये ४ मीटर × १ मीटर × १ मीटर आकाराचा खड्डा तयार करून तो समतल व स्वच्छ करण्यात आला. खड्ड्याच्या तळाशी संरक्षणासाठी भाताचा पेंढा पसरवून त्यावर HDPE/सिलपॉलीन शीट अंथरण्यात आली. शीटच्या कडा माती व दगडांच्या साहाय्याने घट्ट बसविण्यात आल्या. यासाठी मोजपट्टी, दोरी व खुंट्या, फावडे, कुदळ, HDPE/सिलपॉलीन शीट, दगड व माती या साहित्याचा वापर करण्यात आला.

 

 

या उपक्रमाचे आयोजन कृषी सम्राट गटाने कृषी संशोधन केंद्र, फोंडाघाट यांच्या मार्गदर्शनाखाली केले. कोकण जलकुंडाद्वारे पावसाचे पाणी साठवून उन्हाळ्यात त्याचा शेतीसाठी उपयोग करण्याच्या पद्धतीची माहिती प्रात्यक्षिकाद्वारे देण्यात आली. या उपक्रमात वेदांत घाग,करण बन्ने, रीशल मस्केरेन्हस, प्रतिक चौधरी, सिद्धांत शिंदे, आर्यन सावळे, निखिल नागर, आदित्य प्रभुदेसाई, स्वयंभू प्रभुदेसाई, व आशिम कुमार महंती यांनी सक्रिय सहभाग घेतला.