सावंतवाडी पोलिसांकडून भीषण हत्याकांडाचा छडा
स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय सुरू करण्याच्या रागातून मालकाकडून खून
सावंतवाडी:
गोवा येथे घडलेल्या एका भीषण हत्याकांडाचा छडा लावत सावंतवाडी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून याप्रकरणी दोन संशयितांवर भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय सुरू करण्याच्या रागातून शोरमा सेंटर चालकाने आपल्या साथीदाराच्या मदतीने २३ वर्षीय युवकाचा बेदम मारहाण करून खून केला आणि त्यानंतर त्याचा मृतदेह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निरवडे नमसवाडी येथे फेकून देऊन पलायन केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.
याबाबत सावंतवाडी पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार, मयत युवक अजीम जुल्फीकार खान (वय २३, सध्या रा. एस एफ एक्स बिल्डींग, ओल्ड गोवा, मूळ रा. कटिलिया, बहराईच, उत्तर प्रदेश) हा ओल्ड गोवा येथील एका शोरमा सेंटरमध्ये काम करत होता. मयत अजीम आणि त्याच्या मालकाचा मेहुणा एकत्र येऊन स्वतंत्र व्यवसाय सुरू करण्याच्या तयारीत होते. मात्र, हा निर्णय शोरमा सेंटरचा मालक दीपराज संजय गोवेकर (वय २६, रा. आंबोई मालार, दिवार, नॉर्थ गोवा) याला अजिबात रुचला नाही. याच्याच रागातून दि. ६ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी १२ ते १३.३० वाजेच्या सुमारास दीपराज गोवेकर आणि त्याचा मित्र साहिल (पूर्ण नाव माहिती नाही, रा. गोवा) हे दोघे अजीम राहत असलेल्या ओल्ड गोवा येथील खोलीवर गेले. तेथे त्यांनी अजीमला लाकडी दांड्याने, हाताने व लाथांनी अमानुष मारहाण केली.
या गंभीर मारहाणीमुळे अजीम चालण्याच्या स्थितीतही राहिला नव्हता. तरीही संशयितांनी जबरदस्तीने त्याच्या कपड्यांची बॅग भरून त्याला निळ्या रंगाच्या अल्टो गाडीत बसवले. या मारहाणीत जबर दुखापत झाल्यामुळे अजीमचा मृत्यू झाला. अजीमचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर, घडल्या प्रकाराची कोणतीही माहिती पोलिसांना न देता किंवा वैद्यकीय मदत न घेता, दोघा आरोपींनी मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा कट रचला. ते अजीमचा मृतदेह गाडीत घालून थेट सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले आणि सावंतवाडी तालुक्यातील निरवडे नमसवाडी येथील एका आंब्याच्या बागेत रस्त्यालगत फेकून देऊन गोव्याच्या दिशेने पसार झाले.
मंगळवारी सायंकाळी निरवडे येथे अनोळखी युवकाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच सावंतवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व मृतदेह ताब्यात घेतला. मयताच्या खिशातील ओळखपत्र आणि मोबाईलवरून तपास केला असता तो गोव्यात कामाला असल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी तपासाची चक्रे गोवा पोलिसांच्या मदतीने वेगाने फिरवली असता हा सर्व खुनाचा आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रकार समोर आला.
याप्रकरणी मयताचा नातेवाईक मोहम्मद नसीम निजन अली शेख (वय ३२, रा. सांताक्रुज, गोवा, मूळ रा. उत्तर प्रदेश) यांनी दिलेल्या तक्रारीवरून सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद क्रमांक २७५/२०२६ नुसार आरोपी दीपराज संजय गोवेकर आणि त्याचा मित्र साहिल यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०३(१) (खून), २३८(a) (पुरावा नष्ट करणे) आणि ३(५) (सामूहिक इरादा) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अपर पोलीस अधीक्षक श्रीम. नयोमी साटम, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. भागवत, पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक हिंगे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच फॉरेन्सिक टीमला पाचारण करून आवश्यक पुरावे गोळा करण्यात आले आहेत.
या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक हिंगे करत असून फरार आरोपींच्या अटकेसाठी तजवीज सुरू आहे. सदर गुन्हा ओल्ड गोवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेला असल्याने कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करून हा गुन्हा पुढील तपासासाठी गोवा पोलिसांकडे वर्ग केला जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, पोलिसांनी दीपराजचा मित्र साहिल दिवाडकर याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, आपण दोघांनीच मृतदेह तेथे फेकल्याची कबुली साहिलने दिली. यानंतर पोलिसांनी दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. दोघांना आज न्यायालयात हजर केले असता ५ दिवसांची म्हणजेच १२ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात मारहाणीसाठी वापरलेली काठी आणि गुन्ह्यात वापरलेली अल्टो कार जप्त केली जाणार असून मयताचा मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन केला जाणार आहे. अत्यंत जलद गतीने सूत्रे हलवत अवघ्या २४ तासांत या खुनाचा छडा लावल्याबद्दल सावंतवाडी पोलिसांचे कौतुक होत आहे.













