वन्यप्राण्यांमुळे होणाऱ्या नुकसानीची रक्कम वाढवून द्या

राष्ट्रवादीची उपवनसंरक्षक मिलीश शर्मा यांच्याकडे मागणी

​सावंतवाडी:
वन्यजीव प्राण्यांमुळे होणाऱ्या शेती व फळबागांच्या नुकसानीची भरपाई रक्कम वाढवून मिळावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने उपवनसंरक्षक मिलीश शर्मा यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर शेती, बागायती व फळपिकांवर अवलंबून आहेत. मात्र, गेल्या काही काळापासून वन्यजीवांकडून शेती पिके, भाजीपाला तसेच नारळ, सुपारी, काजू आणि आंबा इत्यादी फळबागांचे प्रचंड नुकसान केले जात आहे. या नुकसानीमुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत असून त्यांचा उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले आहे. अशा स्थितीत शासनाकडून मिळणारी नुकसानभरपाई ही प्रत्यक्षातील नुकसानीच्या तुलनेत अत्यंत अपुरी ठरत असल्याचे नाईक यांनी नमूद केले.

​या समस्येवर तोडगा काढण्यासाठी वन्यजीवांमुळे झालेल्या शेती व फळबागांच्या नुकसानीचे तातडीने तसेच सुलभ व पारदर्शक पद्धतीने पंचनामे करण्यात यावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच प्रत्यक्ष बाजारभाव आणि उत्पादन खर्चाचा विचार करून भरपाईची रक्कम वाढवून द्यावी, बाधित शेतकऱ्यांना ही रक्कम विनाविलंब अदा करावी, वन्यजीवांचा उपद्रव टाळण्यासाठी वनविभागाने तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र मदत व मार्गदर्शन व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, असेही निवेदनात नमूद केले आहे. शेतकऱ्यांचे होणारे आर्थिक नुकसान लक्षात घेता या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेऊन योग्य ती कार्यवाही करण्याची विनंती राष्ट्रवादीच्या वतीने करण्यात आली.

​दरम्यान, वाढीव भरपाई देण्याबाबतचा प्रस्ताव वनविभागामार्फत आधीच शासनाकडे सादर करण्यात आलेला आहे, अशी माहिती उपवनसंरक्षक मिलीश शर्मा यांनी यावेळी शिष्टमंडळाला दिली. या प्रसंगी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांच्यासह प्रदेश चिटणीस सुरेश गवस, किसान सेल जिल्हाध्यक्ष दिपक देसाई, सावंतवाडी तालुकाध्यक्ष उदय भोसले, सावंतवाडी विधानसभा अध्यक्ष उमाकांत वारंग, अल्पसंख्याक प्रदेश महासचिव शफीख खान, प्रांतिक सदस्य विलास गावकर, कणकवली शहर अध्यक्ष इम्रान शेख, सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष विजय कदम, सावंतवाडी महिला तालुका अध्यक्ष सौ. रिद्धी परब, महिला शहर अध्यक्ष सौ. मानसी देसाई, डॉ. तुषार भोसले आणि सावंतवाडी तालुका उपाध्यक्ष विलास पावसकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.