राजापूर (वार्ताहर): सहकार भारती महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महिलांसाठी शिर्डी येथे आयोजित करण्यात आलेल्या नारीशक्ती सहकारिता संमेलनात सहकार भारती रत्नागिरी जिल्हा संपर्क प्रमुख श्रुती ताम्हनकर यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरी जिल्ह्यातील महिला संचालिका, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
सहकार भारतीच्या वतीने महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महिलांसाठी दिनांक ३ ते ४ ऑक्टोबर रोजी शिर्डी येथे हे भव्य ‘नारीशक्ती सहकारिता संमेलन’ आयोजित करण्यात आले होते.
या संमेलनात देवेंद्र फडणवीस यांनी ऑनलाईन प्रक्षेपणात मार्गदर्शन केले, तसेच जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखेपाटील, महिला व बालकल्याण विकासमंत्री मेघना बोर्डीकर, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर, सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. उदय जोशी, राष्ट्रीय संघटन मंत्री संजय पाचपोर उपस्थित होते.
या संमेलनात श्रुती ताम्हणकर यांच्या नेतृत्वाखाली राजापूर महिला पतपेढीच्या अध्यक्षा शीतल पटेल आणि उपाध्यक्षा शुभांगी सोलगावकर, संचालिका शिल्पा मराठे, सुधा चव्हाण, सचिव प्रेरणा अमरे, स्नेहा रहाटे, पिग्मी एजंट, व महिला कर्मचारी वर्ग तसेच राजापूर तालुका कुणबी सहकारी पतपेढीच्या संचालिका मानसी दिवटे , अमृता शिवगण आणि कर्मचारी संपदा हातणकर, प्राजक्ता डांबरे तसेच ओणी परिसर पतसंस्थेच्या संचालिका समृद्धी पेणकर आणि महिला बचतगटाच्या महिला या संमेलनात उपस्थित होत्या. यावेळी श्रुती ताम्हणकर यांचा सहकार भारतीच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.
या संमेलनात राज्याच्या महिला व बालकल्याण विकास मंत्री मेघना बोर्डीकर आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित राहून महिलांना मार्गदर्शन केलं. उपस्थितांशी संवाद साधताना विखे पाटील यांनी राज्यातील महिला सक्षमीकरणाच्या वाटचालीवर भाष्य केलं. संपूर्ण राज्यात महिलांच्या सक्षमीकरणासाठी बचत गटांची चळवळ प्रभावीपणे सुरू आहे. या बचत गटांना प्राथमिक सहकारी पतसंस्था आणि सहकार चळवळीशी जोडल्यास ही चळवळ आणखी मोठ्या प्रमाणावर विस्तारेल असे ते म्हणाले.
या संमेलनात राज्यातील विविध संस्थांमध्ये कार्यरत असणाऱ्या दोन हजारांहून अधिक महिला प्रतिनिधी सहभागी होत्या. या क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढावा, त्या प्रशिक्षित व्हाव्यात व येणाऱ्या काळात सहकारी संस्थांमध्ये त्यांचे सक्षम नेतृत्व निर्माण होण्याच्या उद्देशाने या संमेलनात विविध विषयावर चर्चा करण्यात आली.














